spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दक्षिण नागपूरातील स्कूल व्हॅनच्या नियमभंगावर कारवाईची मागणी; शिवसेनेचे वाहतूक पोलिसांना निवेदन

नागपूर :-  दक्षिण नागपूर शिवसेने च्यावतीने अजनी वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वासेकर यांना स्कूल व्हॅनच्या सुरक्षितते संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विधानसभा संघटक विशाल कोरके व धम्मा सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण नागपूरातील रिंग रोड पलीकडील हुडकेश्वर, नरसाळा, पिपळा, बेसा, आदी भागांमध्ये शाळांची संख्या मोठी असून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाच्या स्कूल व्हॅन तसेच खासगी वाहने वापरली जात आहेत. या परिसरात अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल नसल्याने आणि वाहतूक पोलिसांचे पुरेसे लक्ष नसल्याने वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे या भागात स्कूल वाहनांचे अपघातही वारंवार घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिवसेनेने मांडलेल्या प्रमुख मुद्द्यांमध्ये काही स्कूल व्हॅन चालक अल्पवयीन असल्याचा संशय, स्कूल व्हॅनच्या नावाखाली खासगी क्रमांकाच्या वाहनांचा वापर, वाहनांवर चालक व मालकाचे मोबाईल क्रमांक नसणे, चालक व मालकांचे पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) न झाल्याचे प्रकार, काही चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याच्या तक्रारी तसेच वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा व इतर आवश्यक कागदपत्रांची नियमित तपासणी होत नसल्याचा समावेश आहे. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन स्कूल व्हॅन चालक, मालक आणि पालक यांच्यासाठी जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करावी तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालक व मालकांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दक्षिण नागपूर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी नीलिमा शास्त्री, राकेश भोंदले, निरंजन नाकाडे, अतुल डहाके, रुपेश ठाकरे, आझाद ठाकूर, अखिलेश भुगावकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles