spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मालाड येथील शाळेतील प्रार्थना कार्यक्रम प्रकरणी गुन्हा दाखल – गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई :- मुंबईतील मालाड पश्चिम येथील रिजॉयस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना कार्यक्रमाबाबत प्राप्त तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. डॉ.भोयर यांनी सांगितले की, १० मे २०२६ रोजी मालाड पश्चिम येथील रिजॉयस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमात एका व्यक्तीने उपस्थितांच्या डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्यासह जीवनातील दुःख दूर करण्याबाबत दावे केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली असता, उपस्थितांना धर्मांतर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आग्रह करण्यात आल्याचे आढळून आले नाही. तथापि, चौकशीदरम्यान तक्रारदाराला घरामध्ये देवी-देवतांची छायाचित्रे लावू नयेत, असे सांगण्यात आल्याचे निष्पन्न झाले; तसेच संबंधित कार्यक्रमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार निदर्शनास आल्याने मालाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींसह महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शाळांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित होऊ नयेत यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत आवश्यक आदेश निर्गमित करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येईल, असे डॉ. भोयर यांनी सांगितले.

Popular Articles