■ पवनी तालुक्यातील कोरंभी येथील हृदयद्रावक घटना; गावात पसरली शोककळा
■ नागपूरहून सुट्टीसाठी आले होते मूळ गावी; बनकर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
हंसराज,पवनी :- शेतातून घरी परतताना कालव्यात पाय धुण्यासाठी उतरलेल्या पत्नीचा अचानक पाय घसरला आणि ती पाण्याच्या तीव्र प्रवाहात ओढली गेली. डोळ्यांसमोर मृत्यूच्या दाढेत जाणाऱ्या पत्नीला वाचवण्यासाठी पतीने क्षणाचाही विलंब न करता कालव्यात उडी घेतली; मात्र पाण्याचा वेग आणि अथांग खोलीमुळे दोघांचाही बुडून दुर्दैवी अंत झाला. मन हेलावून टाकणारी ही घटना पवनी तालुक्यातील कोरंभी येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत स्वप्निल अशोक बनकर (वय २९) आणि प्रज्ञा स्वप्निल बनकर या तरुण दाम्पत्याचा मृत्यू झाला असून, अवघ्या काही क्षणांत होत्याचे नव्हते झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
नागपूरहून आले होते गावी
मिळालेल्या माहितीनुसार, बनकर हे दांपत्य मूळचे कोरंभी येथील रहिवासी होते. स्वप्निल हे रोजगाराच्या निमित्ताने पत्नी प्रज्ञा यांच्यासह नागपूर येथे वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी कोरंभी येथे आले होते. शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास दोघेही शेतातील काम आटोपून घरी परतत होते.
डोळ्यांसमोर घात झाला!
घरी परतत असताना महादेव देवस्थान मार्गावरील मुख्य कालव्याच्या पायऱ्यांवर पायाला लागलेला चिखल धुण्यासाठी प्रज्ञा बनकर खाली उतरल्या. मात्र, शेवाळ व चिखलामुळे त्यांचा अचानक पाय घसरला आणि तोल जाऊन त्या थेट खोल पाण्यात पडल्या. पत्नी पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे पाहताच, स्वप्निल यांनी कसलाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी पाण्याच्या प्रवाहात उडी घेतली. परंतु, कालव्यात चार मीटरपेक्षा अधिक खोली आणि पाण्याचा प्रचंड वेग असल्याने दोघांनाही पोहून बाहेर पडता आले नाही आणि पाण्याच्या प्रवाहात दोघेही दिसेनासे झाले.
अंधारामुळे बचावकार्यात अडथळे
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ आरडाओरड करत पोलिसांना माहिती दिली. पवनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक व गोताखोरांच्या मदतीने तात्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली; मात्र कालव्यातील पाण्याची प्रचंड खोली, पाण्याचा वेगवान प्रवाह आणि काही वेळातच पडलेला रात्रीचा अंधार यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.
अवघ्या २९ व्या वर्षी ऐन उमेदीत उभ्या राहिलेल्या संसाराचा असा क्षणात अंत झाल्याने कोरंभी गावातील प्रत्येक डोळा पाणावला असून, या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पवनी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.








