spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डोंगरला ग्रामपंचायतीत कागदावरच बांधली नाली; लाखो लाटले, पण जागेवर नालीच गायब!

■ RO प्लांटमध्ये लाखांहून अधिकची उधळपट्टी; टँकरचेही लावले बनावट बिल

■ १५ व्या वित्त आयोगाच्या निधीवर डल्ला मारल्याचा ग्रामस्थांचा आरोप; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार

हंसराज,डोंगरला :- “विकासकामे जमिनीवर नव्हे, तर केवळ कागदावरच करून सरकारी तिजोरीवर हात मारायचा”, असाच काहीसा धक्कादायक प्रकार तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरला ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून लाखो रुपयांचे नाली बांधकाम कागदोपत्री पूर्ण दाखवून पैशांची उचल करण्यात आली; मात्र प्रत्यक्षात घटनास्थळी नालीचे नामोनिशानही नाही! डोंगरला येथे ‘नाली चोरीला गेली की काय?’ असा संतप्त सवाल विचारला जात असून, यासह वॉटर फिल्टर व पाण्याच्या टँकरमध्येही लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ग्रामपंचायत डोंगरला येथे सन २०२४ मध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ‘देवानंद राऊत यांच्या घरापासून ते विनोद नागरीकर यांच्या घरापर्यंत’ नाली बांधकामाचे काम मंजूर करण्यात आले होते. या कामापोटी ग्रामपंचायतीने तब्बल २ लाख ५२ हजार ७७२ रुपयांची रक्कमही उचलली. मात्र, ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिले असता तिथे कोणतीही नाली बांधलेलीच नाही! काम न करताच निधी हडप केल्याचे समोर आल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरओ यंत्रणेच्या खरेदीसाठी ३ लाख ७१ हजार ७१० रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तब्बल ४ लाख ९५ हजार रुपयांचे बिल दाखवून शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात आली. मूळ तरतुदीपेक्षा १ लाख २४ हजार ७१० रुपये जादा खर्च दाखवून जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली.

सन २०२३-२४ मध्ये २ लाख रुपये खर्च करून गावात नवीन वॉटर टँकर खरेदी करण्यात आला होता. तरीही पुन्हा १ लाख ५३ हजार ६०० रुपये खर्च दाखवून टँकर खरेदीचे बनावट बिल सादर करण्यात आले. एकाच कामाची दुबार बिले उचलून शासनाची थेट फसवणूक केल्याचा आरोप आहे.

ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांच्या नावाखाली बनावट बिले तयार करून, नियमांची ऐशीतैशी करत हा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याची तक्रार जागृत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी (BDO) व वरिष्ठ जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

गावाच्या विकासासाठी आलेला निधी अशा प्रकारे घशात घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का? आणि वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पंचनामा करणार का? याकडे आता डोंगरला परिसरासह संपूर्ण तुमसर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles