spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घाटंजीच्या निशा आर्ट गॅलरीच्या तरुणींनी रांगोळीने रेखाटली केळापूरच्या जगदंबेची हुबेहूब प्रतिकृती

– कलाकौशल्यातून देवीचे दर्शन; परिसरात कलाकृतीची चर्चा

पांढरकवडा :- सणासुदीच्या काळात धोधो वाहणाऱ्या शुभेच्छा संदेशांमध्ये मंगलमय वातावरण निर्मिती करणाऱ्या रंगोळ्याचेही फोटो फॉरवर्ड होतात. गेल्या वर्षभरात असे अनेक रांगोळ्यांचे फोटो आले. पण काही रांगोळ्यांनी मनात घर केलं. असंच काहीसं नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी केळापूर जगदंबा संस्थानात घाटंजी तालुक्यातील निशा आर्ट गॅलरीच्या सर्वेसर्वा निशा दरेकर, स्विटी भोयर, पुनम ढगे, रीत पेंन्दोर, छकुली सोनुले या तरुणींनी केळापूरच्या आई जगदंबेच्या प्रवेशद्वारावर काढलेली ही रांगोळी”.. एखादं हुबेहूब चित्र काढ़ावं त्याप्रमाणं रंग अन् रेषांची नजाकत जपत, त्यांचा पुरेपूर वापर करत काढलेली रांगोळी पाहिली की मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तना-मनाने तल्लीन होत काढलेल्या या रांगोळीमागे हातात काय जादू असेल? इतकी अप्रतिम रांगोळी साकारणाऱ्या कलात्मक हातामागे नक्कीच गेल्या जन्मीची पुण्याई किंवा वर्षानुवषाची मेहनत असावी. रांगोळीतील बारकावे पाहताना जमलेल्या भक्तांचे भान हरपले. रांगोळीच्या रंगांतून साकारलेली भक्ती आणि कलाकौशल्याचा सुरेख संगम घाटंजी येथील निशा आर्ट गॅलरीच्या तरुणींनी घडवून आणला. केळापूर येथील प्रसिद्ध जगदंबा देवीची हुबेहूब प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारत या तरुणींनी आपल्या कलागुणांची प्रचिती दिली आहे. देवीचे रूप रांगोळीतून साकारतांना तिच्या चेहऱ्यावरील भाव, अलंकार आणि विविध रंगछटांचा केलेला कल्पक वापर या कलाकृतीचे वैशिष्ट्य ठरते. केवळ रंगांची उधळण न करता सूक्ष्म तपशीलांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे देवीची प्रतिकृती लक्षवेधी ठरली आहे. निशा आर्ट गॅलरीच्या तरुणींनी साकारलेल्या या कलाकृतीतून त्यांची मेहनत, एकाग्रता आणि कलात्मक दृष्टिकोन दिसून येतो. धार्मिक श्रद्धेला कलेची जोड देत त्यांनी केळापूरच्या जगदंबा देवीप्रती आपली भक्तिभावना व्यक्त केली आहे. रांगोळी ही केवळ सजावटीची कला नसून, रंगांच्या माध्यमातून भावना आणि श्रद्धा व्यक्त करण्याचे प्रभावी साधन आहे, याची प्रचिती या कलाकृतीतून येते. घाटंजीच्या तरुणींनी रेखाटलेली जगदंबेची ही प्रतिकृती त्यांच्या कलात्मक प्रतिभेची साक्ष देणारी ठरत आहे.

Popular Articles