– वृक्षसंवर्धन करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्राधान्य
मुंबई :- महामार्गालगत करण्यात येणाऱ्या वृक्षारोपणामध्ये स्थानिक प्रजातींच्या वृक्षांचेच रोपण करण्यात येईल. तसेच, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम पुढाकाराने करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.
थेऊर–लोणीकंद येथील अष्टविनायक महामार्ग रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिपूरक वृक्षारोपणातील कथित उल्लंघनाबाबत सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भोसले बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले की, राज्यातील महामार्गांलगत नियमितपणे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची कामे करण्यात येतील. या वृक्षारोपणामध्ये स्थानिक परिसरातील वृक्षप्रजातींसह फळझाडे आणि फुलझाडांना प्राधान्य दिले जाईल. विदेशी किंवा केवळ शोभेसाठी वापरल्या जाणाऱ्या वृक्षांची लागवड केली जाणार नाही. तसेच, वृक्षांचे जिओ-टॅगिंग करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विभागातील पीएन-३३ अष्टविनायक मार्ग सुधारणा प्रकल्पांतर्गत भाग-३ मधील कर्डे–रांजणगाव, कर्डे–न्हावरा आणि लोणीकंद–थेऊर फाटा या मार्गांवर आतापर्यंत सुमारे २,००० झाडांची लागवड करण्यात आल्याची माहितीही मंत्री भोसले यांनी दिली.




