मुंबई :- मराठवाड्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या १,४०६ जलसंरचनांच्या दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक निधी आणि प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, क्षतिग्रस्त योजनांपैकी ४०३ योजनांमध्ये भराव काम झालेल्या ठिकाणी भराव टाकणे आणि नाल्यांचे खोलीकरण करण्याची कामे सुरू आहेत. यापैकी १९६ कामे पूर्ण झाली असून २०७ कामे प्रगतीपथावर आहेत. ४ मे २०२६ रोजीच्या निर्णयानुसार भराव टाकण्याचे काम अशासकीय संस्थांमार्फत करण्यासाठी प्रति घनमीटर २१ रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.




