spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्टार्टअपद्वारे ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्याची गरज – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

· ‘स्टार्टअप फ्रंटियर 1.0’ कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई :- ज्ञानाचे नाविन्यपूर्ण उपाययोजनांमध्ये, आव्हानांचे संधींमध्ये आणि कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता हीच आजच्या आर्थिक प्रगतीची खरी ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठांनी केवळ पदवी प्रदान करणाऱ्या संस्था न राहता नवोपक्रम, बौद्धिक संपदा, स्टार्टअप्स आणि समाजपरिवर्तन घडविणाऱ्या केंद्रांमध्ये विकसित व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व आय स्पार्क फांऊडेशनमार्फत आयोजित ‘स्टार्टअप फ्रंटियर 1.0’ या दिवसभराच्या परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एचपी इंडियाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता, कौशल्य विकास आयुक्त डॉ. अमित सैनी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपाल सचिवालयाचे सहसचिव एस. राममूर्ती, महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. वैभव नारवडे, तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर, गुंतवणूकदार, मार्गदर्शक, उद्योजक, स्टार्टअप्स, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मेडिकल लॅब आणि एचपी क्रिएटिव्ह गॅरेज लॅब यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश वाचून दाखवला.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, भारतात कल्पकता आणि नवोपक्रमांची कमतरता नाही, मात्र या नवकल्पनांचे समाजोपयोगी उपाययोजना आणि यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. या दृष्टीने ‘स्टार्टअप फ्रंटियर 1.0’ सारखे व्यासपीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. सिंगापूर, इस्रायल आणि स्वित्झर्लंड यांसारख्या देशांकडे विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती नसतानाही त्यांनी मानवी भांडवल, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांच्या बळावर जागतिक प्रगती साधली आहे. भविष्यात विद्यापीठांची ओळख त्यांनी निर्माण केलेल्या नवोपक्रमांवर, बौद्धिक संपदेवर, प्रोत्साहन दिलेल्या स्टार्टअप्सवर आणि समाजावर झालेल्या सकारात्मक परिणामावर ठरेल.विकसित भारताचा अर्थ केवळ आर्थिक समृद्धी नसून सर्वांच्या सर्वांगीण विकासाशी तो जोडलेला आहे. ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः’ या भारतीय तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेत सर्वसमावेशक, न्याय्य आणि समान संधी देणारा समाज घडविण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हा मंत्र घोषवाक्य केवळ नसून देशाच्या विकासाचे व्यापक ध्येय असल्याचे सांगून राज्यपाल वर्मा म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कौशल्य विकास, उद्योजकता आणि नवोपक्रमांचे लाभ पोहोचले पाहिजेत.

स्टार्टअप फ्रंटियर 1.0 : नवोपक्रमाला चालना देणारा उपक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संदेशात म्हणाले की, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत उल्लेखनीय प्रगती केली असून, उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्य विकास, रोजगारक्षमतेत वाढ, उद्योजकता प्रोत्साहन आणि नवोपक्रमाधारित उपक्रमांच्या माध्यमातून ६१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम घडविला आहे. एमएसएसयूआयआर्क फाउंडेशन, इन्क्युबेटर यांसारख्या उपक्रमांमुळे नवउद्योजकआणि युवा नवोपक्रमकर्त्यांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत. आयआयटी मद्रास प्रवर्तक यांच्याशी झालेल्या भागीदारीतून विद्यार्थ्यांना डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑपरेशन्स विषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच एचपी गेमिंग गॅरेज आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी प्रयोगशाळेच्या उद्घाटनामुळे विद्यार्थ्यांना उदयोन्मुख उद्योगांच्या गरजांनुसार अत्याधुनिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होईल. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना नवोपक्रम, स्टार्टअप्स आणि उद्योजकता हे आर्थिक विकासाला गती देणे, रोजगारनिर्मिती करणे आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

स्टार्टअप चळवळ प्रत्येक गावापर्यंत पोहचवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, स्टार्टअप चळवळ ही केवळ काही शहरांपुरती किंवा विशिष्ट वर्गापुरती मर्यादित न राहता ती राज्यातील प्रत्येक गावापर्यंत, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागापर्यंत पोहोचली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप संस्कृती रुजविण्याचे काम सुरू असून, त्यासाठी उद्योग, शैक्षणिक संस्था, गुंतवणूकदार आणि समाजाच्या सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे.महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील आघाडीचे स्टार्टअप केंद्र बनविण्यासाठी ही चळवळ घराघरात पोहोचविण्याचा शासनाचा निर्धार आहे.

६० महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू : अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा वर्मा

अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून स्टार्टअप वीक, स्टार्टअप यात्रा, हॅकाथॉन आणि इनोव्हेशन चॅलेंजेस यांसारख्या उपक्रमांतून राज्यभरातील युवकांना संधी दिली जात आहे. राज्य शासनाकडून पेटंटसाठी आर्थिक सहाय्य, इन्क्युबेटर्सना बळकटी, प्रादेशिक नवोपक्रम केंद्रे आणि विद्यापीठांमधील नवोपक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने ६० महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन केंद्रे सुरू करून विद्यार्थ्यांना उद्योग, गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. आयआयटी मद्राससोबतच्या सामंजस्य करारामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर व ऑपरेशन्स विषयातील प्रमाणित प्रशिक्षण मिळणार असून त्यासाठी सीएसआरचा निधी उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना दिशा देणारी परिसंस्था उभारणार : कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर

डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या की, प्रयोगशाळा उभारणे, प्रोटोटाइप आणि पुढे स्टार्टअपपर्यंत विद्यार्थ्यांच्या कल्पनांना दिशा देणारी परिसंस्था उभारणे ही काळाची गरज आहे.महाराष्ट्र शासनाने अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स (एवीजीसी) तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात पुढाकार घेतला आहे. ‘महा एआय शाळा’ उपक्रम आणि एचपी क्रिएटर्स गॅरेज लॅब्समुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळून भविष्यातील नवोन्मेषक आणि उद्योजक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘एचपी क्रिएटर्स गॅरेज लॅब्स’मधून विविध क्षेत्रांत प्रशिक्षण: इप्सिता दासगुप्ता

इप्सिता दासगुप्ता म्हणाल्या की, मुंबईतील भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था (आयआयसीटी ) आणि ‘महा एआय शाळा’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण व प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.‘एचपी ड्रीम्स अनलॉक्ड’ उपक्रमाद्वारे ४.५ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे.राज्य शासनाच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या ‘एचपी क्रिएटर्स गॅरेज लॅब्स’मधून गेम डिझाइन, एआय, सायबर सुरक्षा, कोडिंग आदी क्षेत्रांत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, हॅकाथॉन आणि प्रकल्पाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि आयआयटी मद्रास यांच्यात सामंजस्य करार

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि आयआयटी मद्रास यांच्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उद्योग-संबंधित कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला या अंतर्गत ऑनलाइन शिक्षण, प्रमाणपत्र, इंटर्नशिप आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. ‘व्हर्टिव्ह’ या कंपनीच्या सीएसआर निधीतून एक मोफत कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला जात आहे. महाराष्ट्रातील १५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षत करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या शाखेतील २०२६ या वर्षा मध्ये उत्तीर्ण झालेले आणि २०२७ मध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थ्यी यांचा यामध्ये समावेश असेल. डेटा सेंटर ऑपरेशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट.,क्रिटिकल पॉवर आणि कूलिंग सिस्टीम्स,भौतिक सुरक्षा प्रणाली,ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स पद्धती व उद्योग मानके या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल.या प्रशिक्षणांमुळे डेटा सेंटर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळतील.

उदयोन्मुख क्षेत्रांतील स्टार्टअप्सचा प्रदर्शनात सहभाग

स्टार्टअप प्रदर्शनामध्ये कृषी, शिक्षण, फिनटेक, डीपटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग (एमएल) तसेच इतर उदयोन्मुख क्षेत्रांतील स्टार्टअप्सनी विकसित केलेली नाविन्यपूर्ण उत्पादने आणि तंत्रज्ञानाधारित उपाय सादर करण्यात आले या कार्यक्रमात स्टार्टअप मार्गदर्शन विषयांवरील परिसंवाद पार पडले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.