spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हरित अभियानांतर्गत पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण; नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन

– वनसंरक्षण, वृक्षसंवर्धन आणि जनसहभाग वाढविण्यावर भर – उपवनसंरक्षक दिपाली तलमले

गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र हरित अभियान २०२६’ अंतर्गत वन विभागाच्या आल्लापल्ली वनविभागातील पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम तसेच नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उद्घाटनाचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला, तसेच त्यांच्या हस्ते पेडीगुड्डम वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले.

मिश्र रोपवन २०२६ उपक्रमांतर्गत कक्ष क्रमांक १८५, नियतक्षेत्र जामगाव, उपक्षेत्र गोमनी येथे पाच हेक्टर क्षेत्रावर विविध स्थानिक व उपयुक्त प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी उपवनसंरक्षक दिपाली तलमले, उपविभागीय वनाधिकारी शिशुपाल पवार तसेच जामगावचे पोलीस पाटील अरविंद निखाडे यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.

उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना उपवनसंरक्षक तलमले यांनी वृक्षलागवड ही केवळ एकदिवसीय उपक्रम न राहता ती लोकचळवळ बनणे आवश्यक असल्याचे सांगितले. लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन, जैवविविधतेचे संवर्धन आणि वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या हस्ते पेडीगुड्डम वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यालयाची पाहणी करताना त्यांनी वनसंरक्षण, वनविकास, वृक्षलागवड, वनगुन्हे प्रतिबंध आणि जनसहभाग वाढविण्यासाठी नियोजनबद्ध व परिणामकारक पद्धतीने काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शासनाच्या विविध वनविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार, सर्व क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, वनमजूर, क्षेत्रीय कर्मचारी तसेच जामगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी “एक झाड लावा, पर्यावरण वाचवा” हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवडीबरोबरच रोपांचे संगोपन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास, जैवविविधतेचे संवर्धन होण्यास तसेच वनसंरक्षणाच्या प्रयत्नांना अधिक चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.