spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

देशातील सर्वात मोठे ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन सेंटर होतेय नागपुरात

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूर :- अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शने, परिषदा याकरिता कन्व्हेंशन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर ख्यात होईल आणि नागपूर शहराला एक वेगळी ओळख त्यामुळे मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

दाभा गावालगत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या २१.७ हेक्टर जागेत राज्य सरकारतर्फे हे सेंटर उभारले जात आहे. विमानतळ, रेल्वे स्थानक यापासून अगदीच कमी अंतरावर हे सेंटर आहे. झिरो माईलपासून या सेंटरचे अंतर अवघे ७.८ कि.मी. आहे. चारही दिशांनी असलेली कनेक्टिव्हिटी हे या सेंटरचे वैशिष्ट्य आहे. सेंटरच्या बाहेरील भागात लँडस्केप, कारंजे राहतील. आतील भागात कॉन्फरन्स व सेमिनार हॉल, बोर्ड रूम, डायनिंग हॉल असेल. याशिवाय भव्य पार्किंग या ठिकाणी असणार आहे. दुचाकी, चारचाकींसहच बसेससाठीही मोठी पार्किंग व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे.

२ हजार आसन क्षमतेचे ऑडिटोरियम हे येथील आणखी एक वैशिष्ट्य आहे. येथील सभागृह आकारमानाने देशातील सर्वात मोठे सभागृह असणार आहे. अग्निसुरक्षेच्या सर्व अत्याधुनिक उपाययोजना या ठिकाणी करण्यात येत आहेत. हा प्रकल्प उभारण्याची जबाबदारी एमएसआयडीसीला देण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता नरेश बोरकर यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. सध्या या प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, खा. माया इवनाते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.