spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा दिल्लीकरांच्या भेटीला

– महाराष्ट्र सदन येथे तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन

नवी दिल्ली :-  महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, नागपूर (महाटेक्स) आणि येथील महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाले.

प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये नुकत्याच झालेल्या ‘भारत टेक्स २०२६’ च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा परिचय दिल्लीकरांना करून देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत या तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि व्यवस्थापक प्रमोद कोलापटे उपस्थित होते. तसेच रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे, रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, अशोक वडवले, महाटेक्सचे गणेश ठाकूर, रूपेश खापेकर आदी उपस्थित होते.

दिल्लीतील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन महाराष्ट्रातील विणकर आणि कारागिरांकडून दर्जेदार उत्पादने थेट खरेदी करून ‘व्होकल फॉर लोकल’ संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी केले.

‘भारत टेक्स २०२६’मध्ये महाराष्ट्राच्या दालनाला देश-विदेशातील खरेदीदारांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विणकर, कारागिर आणि स्वयं-सहायता गटांनी तयार केलेली उत्पादने दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावीत, तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रवारशाचा व्यापक प्रचार व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रकलेचा समृद्ध वारसा अनुभवता येणार असून, अस्सल पैठणी, करवत काठी साड्या, पारंपरिक हिमरू, खण, सोलापूरच्या प्रसिद्ध चादरी, बांबू व टेरी टॉवेल्स तसेच जीआय (GI) टॅग प्राप्त कोल्हापुरी चपला यांसह विविध हातमाग व रेशीम उत्पादने थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.हे प्रदर्शन १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

Popular Articles