नागपूर :- इनर व्हील क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटीचा पदग्रहण समारंभ सिताबर्डी येथील फॉरच्युन मॉलमध्ये उत्साहपूर्ण पार पडला. यावेळी क्लबच्या नूतन अध्यक्षा स्मिता बागडदेव यांनी तर मोनिका वारोतकर यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला. नव्या कार्यकारिणीने आगामी वर्षात समाजोपयोगी व सेवाभावी उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. समारंभा दरम्यान क्लबतर्फे तीन महत्त्वपूर्ण सेवा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. ‘इनर व्हील ब्रँडिंग प्रोजेक्ट’ अंतर्गत इनर व्हीलचे नाव व लोगो असलेल्या ६० छत्र्या सदस्यांनी खरेदी करून त्या गरजू नागरिकांना वितरित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. तसेच मावळत्या अध्यक्षा डॉ. शारदा रोशनखेडे यांच्या हस्ते दहावीतील पाच गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याशिवाय, आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या दहावीतील विद्यार्थिनी अनन्या उपासे हिच्या शिक्षणासाठी रिता रावका व वैशाली चिंचोळकर यांनी आर्थिक मदत प्रदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या डिस्ट्रिक्ट चेअर मन मनीषा चौधरी उपस्थित होत्या. त्यांनी सेवाभाव, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उत्तरदायित्व या विषयांवर मार्गदर्शन करत समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध कलाकार प्रियंका ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी क्लबच्या संपादक सीमा मेटांगळे यांनी नव्या वर्षातील क्लबचे पहिले बुलेटीन “स्वामिनी” प्रकाशित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मा देठे व वर्षा पानबुडे यांनी केले. समारंभाला क्लबच्या सदस्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली आगामी वर्षात शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक सेवा आणि गरजूंच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





