भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर पोलिसांनी आपला मोर्चा वळवला असून, कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करण्यात आली आहे. मौजा मांडवी येथे पोलिसांनी धाड टाकून अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला असून, एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारधा पोलीस स्टेशनचे पथक गस्तीवर असताना त्यांना मांडवी परिसरात अवैध रेतीची चोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ मौजा मांडवी येथे छापा टाकला. यावेळी महेश कवडू ठवकर (वय २२ वर्ष, रा. मांडवी, जि. भंडारा) हा तरुण आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर आणि ट्रॉलीद्वारे विनापरवाना रेतीची वाहतूक करताना रंगेहात सापडला.
या कारवाईत पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीचा निळ्या रंगाचा ‘सोनालीका’ कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. MH 36 L 3307), १ लाख रुपये किमतीची विना क्रमांकाची निळी ट्रॉली आणि ६ हजार रुपये किमतीची १ ब्रास रेती, असा एकूण ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी ही जप्ती करण्यात आली.
याप्रकरणी आरोपी महेश ठवकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा (अ.क्र. ६२६/२६) नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इंगळे व आंधळगाव पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास कारधा पोलीस करत आहेत.




