हंसराज भंडारा :- जनावरांची अत्यंत निर्दयतेने आणि अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या एका टोळीवर भंडारा जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खमारी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ३१ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह १० म्हशींची सुटका केली असून, याप्रकरणी वाशिम जिल्ह्यातील दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा मिळालेल्या माहितीनुसार, कारधा पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंगवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, एका आयसर ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा हॉटेल विलेजसमोर, खमारी येथे सापळा रचला. संशयास्पद वाटणारा शेंदरी रंगाचा आयसर ट्रक (क्रमांक MH-30-BD-6503) थांबवून त्याची झडती घेतली असता, पोलिसांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले.
जनावरांचे हाल आणि क्रूरतेची सीमा ट्रकच्या आत तब्बल १० म्हशींना अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयपणे कोंबले होते. या मुक्या प्राण्यांना हालचाल करता येऊ नये म्हणून आखूड दोरीने बांधण्यात आले होते. विशेष म्हणजे, या प्रवासात जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. प्राण्यांना इजा होईल आणि त्यांचा श्वास गुदमरेल अशा क्रूर पद्धतीने ही वाहतूक सुरू होती. पोलिसांनी तातडीने या सर्व जनावरांची सुटका केली.
दोन आरोपींना अटक, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त या कारवाईत पोलिसांनी पवन संतोष ठाकरे (वय ३३ वर्ष, रा. शेलुबाजार, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम) आणि गणेश पांडुरंग सुर्वे (वय ३८ वर्ष, रा. लाठी, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम) या दोन आरोपींना अटक केली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये २५ लाख रुपये किमतीचा आयसर ट्रक आणि ६ लाख रुपये किमतीच्या १० म्हशी, असा एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कडक कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल याप्रकरणी पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० च्या कलम ११(१)(घ)(ड)(च)(ज)(झ) सहकलम ११९ अन्वये गुन्हा (अ.क्र. ६२५/२०२६) दाखल केला आहे. ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवादार पंचबुद्धे, स्थागुशा आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास कारधा पोलीस करत आहेत.




