Home Latest News उपजीविका सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

उपजीविका सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

0
21

नागपूर :- उपजीविका सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

रविवार, 19 जुलै रोजी एओपी पोलीस कॅम्प, गोठणगाव (पोलीस स्टेशन किशोरी हद्द) येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा केळवद व जिल्हा परिषद शाळा गोठणगाव येथील सुमारे 150 गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, कंपास बॉक्स तसेच अन्य आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक शुभम नवले (पोलीस स्टेशन किशोरी), पोलीस निरीक्षक अरविंद जाधव (सीआरपीएफ एओपी गोठणगाव), डॉ.अनिल बुटले (लायन्स क्लब), समाजसेवक सुहास खरे, मुख्याध्यापक ठाकरे सर, नारायण बुद्धवंत, सतीश भोवते (मेजर, पोलीस स्टेशन गोठणगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपक्रमाचे नियोजन एओपी कॅम्प गोठणगावचे पोलीस निरीक्षक निलकंठ गीते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष धिरज गलगले, कार्याध्यक्ष विलास कडू, अनिल जवाडे, मनीष पाठराबे, उपाध्यक्ष जयंत तुरणकार, सचिव संजय मार्कंडे, कोषाध्यक्ष सौ. मनीषा गलगले, स्वप्नील बाराहाते, प्रमोद पारधी, करुणा गलगले, साहेबराव पांडव तसेच संस्थेचे सदस्य, पोलीस स्वयंसेवक आणि स्थानिक प्रतिनिधींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

यावेळी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्याचा संस्थेचा हा उपक्रम समाजाभिमुख आणि प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.