spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घरफोड्या करणाऱ्या कोल्हटकर टोळीला दणका; दोन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार

– तुमसर पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल

हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीवर आणि अवैध व्यवसायांवर  प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या ‘आकाश कोल्हटकर टोळी’वर हद्दपारीची कुऱ्हाड चालवण्यात आली असून, या टोळीतील तिघांना भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक आणि हद्दपार प्राधिकरण यांनी १७ जुलै २०२६ रोजी या कारवाईवर शिक्कामोर्तब केले आहे.

पोलीस रेकॉर्डवरील माहितीनुसार, या टोळीचा प्रमुख आकाश श्याम कोल्हटकर (रा. मालवीय नगर, तुमसर) असून त्याच्या टोळीमध्ये छानेंद्र ऊर्फ शैलेश बळीराम फुंडे (रा. बामणी, जि. गोंदिया, सध्या मुक्काम तुमसर) आणि रामकिसन बारकू तिवाडे (रा. खैरलांजी, जि. गोंदिया, सध्या मुक्काम तुमसर) यांचा समावेश आहे. या टोळीवर तुमसर पोलीस ठाण्यात घरफोडीचे एकूण ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांच्या कृत्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी तुमसर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये या टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता.

या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत हद्दपार प्राधिकरणाने आरोपींना दोन जिल्ह्यांच्या सीमेतून एक वर्षासाठी बाहेर काढण्याचे आदेश जारी केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम् विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली. या मोहिमेत तुमसरचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या (डी.बी.) पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम, शरद रामटेके, झंझाड, बळदे, गिरीपुंजे, बावने, दमाहे आणि चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.