साकोली :- भंडारा जिल्हा पोलीस दलांतर्गत येणाऱ्या साकोली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात मोठे यश मिळवले आहे. साकोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सातत्याने घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून तब्बल ४ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी २ लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. २१ जुलै २०२६ रोजी पोलिसांनी ही महत्त्वाची कारवाई केली.
साकोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अपराध क्रमांक ५७८/२०२६, कलम ३३१(३) BNS अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रोहित उर्फ राजा हिवराज गेडाम (वय २४ वर्ष, रा. जमनापूर), राहुल गोपीनाथ टेंभुर्णे (वय ३१ वर्ष, रा. जमनापूर) आणि नितेश गजानन ईलमकर (वय ३२ वर्ष, रा. सातलवाडा) या तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १,४५,००० रुपयांचा मुद्देमाल सुरुवातीला हस्तगत केला.
सध्या हे तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत (PCR) असून, पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या अधिक तपासात त्यांनी साकोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत यापूर्वी सुद्धा तीन ठिकाणी घरफोडी केल्याची धक्कादायक कबुली दिली. त्यांच्या या कबुलीवरून साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेले अपराध क्रमांक ५९/२०२६, २७३/२०२६ आणि ४४५/२०२६ असे आणखी तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्व गुन्ह्यांमधील सोन्या-चांदीचे व बेन्टेक्सचे दागिने असा एकूण २,३५,५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साकोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पार पाडली. घरफोडी करणाऱ्या या टोळीला जेरबंद केल्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. सदर प्रकरणाचा पुढील सखोल तपास साकोली पोलीस करत आहेत.





