spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज व राहुल गांधींच्या अटकेचा भंडाऱ्यात तीव्र निषेध; काँग्रेसचे जोरदार आंदोलन

हंसराज भंडारा :- दिल्लीमध्ये आपल्या न्याय्य हक्कासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव व इंडिया आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ आज भंडारा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेसच्या वतीने आज स्थानिक गांधी चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, सरकारने त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेचे पडसाद आज भंडाऱ्यात उमटले.

गांधी चौकात जमा झालेल्या शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके द्या, लाठ्या नव्हे”, “लोकशाही वाचवा, संविधान वाचवा”, “मोदी सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

या आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भंडारा शहर ठाणेदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद विनोद साखरकर म्हणाले की, “आज देशात लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. विद्यार्थ्यांच्या वेदना समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठ्या चालवणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नेत्यांना अटक करणे, हे अत्यंत निंदनीय आहे. सरकारने आपली दडपशाही त्वरित थांबवून संवादाचा मार्ग स्वीकारावा. जर सरकारने आपली भूमिका बदलली नाही, तर आगामी काळात भंडारा जिल्ह्यात ‘भंडारा बंद’ पाळून तीव्र ‘जेल भरो’ आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, सर्व तालुका काँग्रेस कमिट्यांचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.