spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लाखांदूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: घरफोडीचा पर्दाफाश करत अट्टल चोरट्यास ठोकल्या बेड्या; १.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

हंसराज,भंडारा लाखांदूर :- शेतीकामासाठी कुटुंब बाहेर गेल्याची संधी साधून घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात लाखांदूर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून चोरीचे सोने-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने, असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मडेघाट (ता. लाखांदूर) येथील रहिवासी फिर्यादी जितेंद्र कुंडलीक ठाकरे (३१) हे १६ जुलै २०२६ रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह शेतात कामाला गेले होते. घराला कुलूप लावून चाबी खिडकीत ठेवली होती. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात प्रवेश केला आणि कपाटातील रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ठाकरे यांनी १८ जुलै रोजी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली.

तपासाचे धागेदोरे आणि अटक गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पंकज नामदेव काळसर्पे (३६, रा. महागाव, जि. गोंदिया, ह.मु. हरदोली) याला २१ जुलै रोजी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने चोरलेले दागिने कोंढा येथील ‘बाबाजी मस्कें ज्वेलर्स’ येथे विकल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ज्वेलर्स मालक बाबाजी रमेश मस्के (४०) यांच्याकडून ३.६३० ग्रॅम सोन्याची लगड आणि ९.४६० ग्रॅम चांदीचे जोडवे जप्त केले.

वाहन आणि मुद्देमाल जप्त आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो प्लेजर स्कूटी (एम.एच. ३१ डी.डब्ल्यू. ८४८९) आणि हिरो होंडा पॅशन प्लस (एम.एच. ३१सी.यु.८७५) या दोन दुचाकींसह सोन्याचे पिटी मणी असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

कायदेशीर कारवाई सदर प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS)- २०२३ च्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला न्यायालयाने २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

यांनी केली कारवाई ही यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ज्योतीका इंगळे लाखांदूरचे पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गँद्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पो.अं. ओंकार सपाटे, लंकेश राऊत, अमित उईके आणि निलेश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.