spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कर्क रोगापासून लेकींचे सुरक्षा कवच: चंद्रपुरात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम ८ सप्टेंबरपर्यंत वाढवली!

– पालकांनी अफवांना बळी न पडता मुलींचे लसीकरण करावे: मनपाचे आवाहन

चंद्रपूर :- महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (सर्व्हायकल कॅन्सर) वाढते प्रमाण रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) लसीकरण मोहीम आता ८ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

लसीकरणाचे महत्त्व:

ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. भारतातील महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार आहे. २०२२ च्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ३४,८०५ मृत्यू या आजारामुळे झाले आहेत. विशेष म्हणजे, हा असा एकमेव कर्करोग आहे जो लसीकरणाद्वारे पूर्णपणे टाळता येऊ शकतो.

मोहिमेची वैशिष्ट्ये व वेळ:

पात्रता: १४ वर्षे पूर्ण परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुली.

लस व शुल्क: ‘गार्डासील’ (Gardasil) ही सुरक्षित लस पूर्णपणे मोफत दिली जात आहे.

वेळ: रविवार व सुट्टीचे दिवस वगळून रोज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत (शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १२).

नियम: लसीकरणासाठी पालकांची लेखी संमती अनिवार्य आहे. तसेच मुलीने घरून नाश्ता किंवा जेवण करून येणे आवश्यक आहे.

चंद्रपूर मनपाची तयारी:

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ७ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ही मोहीम राबवली जात आहे. शाळा, अंगणवाडी आणि नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती केली जात आहे. यासोबतच, ० ते ५ वर्षे वयोगटातील बालके व गरोदर महिलांचे नियमित लसीकरणही सुरळीत सुरू ठेवण्यात आले आहे.

लस पूर्णपणे सुरक्षित – अफवांवर विश्वास ठेवू नका!

एचपीव्ही लसीमुळे वंध्यत्व, गर्भपात किंवा जन्मदोष होतात या केवळ अफवा आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ही लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी असल्याचे प्रमाणित केले आहे. त्यामुळे पालकांनी कोणतीही भीती न बाळगता आपल्या मुलींचे आरोग्य सुरक्षित करावे.

लसीकरणासाठी काय आवश्यक?

लसीकरणासाठी यू-विन (U-Win) पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. यासाठी पालकांचे मोबाईल नंबरशी लिंक असलेले ओळखपत्र/आधारकार्ड आणि मुलीच्या जन्माचा दाखला सोबत आणावा.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.