spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अखेर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे फळ पिक विम्याचे ट्रिगर जाहीर !  

– राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघर्षाला यश ! 

– आता फळपिक विमा भरपाई तातडीने जमा करण्याची मागणी ! 

मोर्शी :- जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा फळपीक विमा वेळेत देणे ही शासनाची जबाबदारी असतांनाही ट्रिगर जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो, ही शासनाच्या कारभाराची मोठी शोकांतिका आहे. लाखो संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात असताना शासन आणि संबंधित यंत्रणा मात्र वेळकाढूपणा करत असतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघर्षाला यश आले असून 2025-26 च्या हवामानावर आधारित आंबिया बहार संत्रा फळ पिक विम्याचे ट्रिगर अखेर जाहीर करण्यात आले असून, अमरावती विभागातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रिगर जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी सातत्याने पाठपुरावा करत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कृषी विभागाने व विमा कंपनीने ट्रिगर जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

आंबिया बहार संत्रा फळ पिक विम्याचा कालावधी 31 मे रोजी संपल्यानंतर शासनाच्या नियमानुसार निश्चित कालावधीत ट्रिगर जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, ट्रिगर जाहीर होण्यास झालेल्या विलंबामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक चिंतेत सापडले होते. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वाखाली विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती यांना निवेदन देऊन ८ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. ट्रिगर जाहीर न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन कृषी विभाग व विमा कंपनीने अखेर ट्रिगर जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीला यश मिळाले आहे. मात्र, ट्रिगर जाहीर करणे हा केवळ पहिला टप्पा असून, आता पात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई तातडीने जमा करावी त्यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाने तत्काळ त्यांचा विमा हिस्सा विमा कंपनीला अदा करून १५ दिवसाच्या आत विमा धारक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा न झाल्यास जिल्ह्यातील पालकमंत्री खासदार आमदार यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्यातर्फे देण्यात आला आहे.

“संत्रा उत्पादक शेतकरी संकटात असतांना जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पालकमंत्री नेमके कुठे होते? शेतकऱ्यांच्या हक्काच्या संत्रा फळ पिक विम्यासाठी लोकप्रतिनिधींनी एकदाही ठाम भूमिका घेतली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाकडे पाठपुरावा करण्याऐवजी त्यांनी मौन बाळगले. अखेर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याचा इशारा द्यावा लागला आणि त्यानंतरच ट्रिगर जाहीर झाले. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय असून केंद्र सरकार व राज्य सरकारने त्यांचा हिस्सा तत्काळ अदा करून प्रत्येक पात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात फळपीक विमा भरपाई वेळेत जमा केली पाहिजे अन्यथा गरज पडल्यास पुन्हा आंदोलन उभारू असा इशारा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.