– श्रीमती किशोरिताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी देशात तृतीय, महाराष्ट्रात अव्वल
– गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन व नवोपक्रमाच्या बळावर राष्ट्रीय यश; विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक गौरव
कामठी/नागपूर :- कामठी शहराच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची आणि विदर्भासाठी ऐतिहासिक ठरणारी कामगिरी करत श्रीमती किशोरिताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठीने क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) च्या राष्ट्रीय रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट फार्मसी महाविद्यालयांमध्ये तृतीय क्रमांक, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे कामठीचे नाव राष्ट्रीय शैक्षणिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकले आहे.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) ने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सर्व फार्मसी महाविद्यालयांना QCI रँकिंग प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य केले होते. गुणवत्ता, अध्यापन, संशोधन, विद्यार्थी विकास, उद्योग-संस्था समन्वय, पायाभूत सुविधा, प्रशासन आणि नवोपक्रम अशा विविध निकषांवर झालेल्या कठोर मूल्यमापनानंतर ही प्रतिष्ठेची रँकिंग जाहीर करण्यात आली.
महाविद्यालयाला यापूर्वीच NBA मान्यता, NAAC कडून A+ ग्रेड तसेच सलग नऊ वर्षे NIRF रँकिंगमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे QCI मधील हे यश संस्थेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेची राष्ट्रीय पातळीवरील भक्कम साक्ष ठरले आहे.
डी. फार्म., बी. फार्म., एम. फार्म. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांसह संशोधन, पेटंट्स, आंतरराष्ट्रीय दर्जाची संशोधन प्रकाशने, उत्कृष्ट प्लेसमेंट आणि उद्योग क्षेत्राशी प्रभावी समन्वय यामुळे हे महाविद्यालय मध्य भारतातील अग्रगण्य फार्मसी शिक्षण व संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाते. ICMR, DHR, AICTE, DST, SERB, RGSTC आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून संस्थेला अनेक संशोधन प्रकल्प व अनुदाने प्राप्त झाली आहेत.
या ऐतिहासिक यशाबद्दल आनंद व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच APTI आणि IPCA चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मिलिंद जे. उमेकर यांनी सांगितले की, “हे यश संस्थेच्या प्रत्येक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि व्यवस्थापनाच्या सामूहिक परिश्रमांचे फलित आहे.”
त्यांनी संस्थेच्या अध्यक्षा किशोरि भोयर, सचिव सुरेश भोयर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय यादवराव भोयर यांच्या दूरदृष्टीचे स्मरण करत, “राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संस्थांमध्ये स्थान मिळविण्याचे त्यांचे स्वप्न आज साकार झाले,” असे गौरवोद्गार काढले.
यावेळी डॉ. नेहा राऊत (QCI समन्वयक), प्रा. बी. जी. टाकसांडे (डीन – मानांकन व रँकिंग) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
कामठीच्या शैक्षणिक इतिहासातील सुवर्णक्षण
देशात तिसरा आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत श्रीमती किशोरिताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीने केवळ एक पुरस्कार जिंकलेला नाही, तर गुणवत्ता, संशोधन आणि उत्कृष्ट शिक्षणाच्या बळावर कामठी, नागपूर आणि संपूर्ण विदर्भाचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकावला आहे. हे यश भावी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून फार्मसी शिक्षण क्षेत्रात संस्थेचे नेतृत्व अधिक बळकट करणारे आहे.





