spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्मार्ट मीटरच्या वाढीव बिलांविरोधात साकोलीत ठिय्या आंदोलन ५०० रुपयांचे बिल २५०० वर गेल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वीज वितरण कंपनीला निवेदन

हंसराज,भंडारा साकोली :- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने दिलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या आवाहनानुसार, २४ जुलै रोजी साकोली तालुका कौन्सिलच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी एका शिष्टमंडळाने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक कार्यकारी अभियंता एन.जी. गडपायले यांनी हे निवेदन स्वीकारले.

या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार यांनी केले. शिष्टमंडळात पी.जी. वसुले, सुनंदा रामटेके, देवांगना सयाम, विकास सिडाम, वासंती शहारे आणि कुमार रामटेके यांचा समावेश होता. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठवलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावले जाणार नाहीत असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन किंवा कारवाईची भीती दाखवून मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. या नवीन मीटरमुळे वीज बिले भरमसाट येत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली आहे.

आंदोलन सुरू असतानाच साकोलीतील शिवाजी वार्ड येथील एका महिलेने आपली व्यथा मांडली. संबंधित महिलेच्या माहितीनुसार, मे महिन्यापर्यंत जुन्या मीटरवर ५०० रुपयांपर्यंत येणारे वीज बिल, जून महिन्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जुलै महिन्यात थेट २५०० रुपये आले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या सामान्य ग्राहकांसाठी ही वाढीव रक्कम भरणे अशक्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाद्वारे ग्राहकांच्या परवानगीशिवाय लावलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर लावण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने नॅशनल स्मार्ट मीटर ग्रिड मिशन अंतर्गत दिलेली कंत्राटे रद्द करावीत आणि कोणत्याही ग्राहकावर मीटरसाठी सक्ती करू नये, असेही यात म्हटले आहे. प्राप्त झालेले निवेदन तातडीने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्याचे आश्वासन सहाय्यक कार्यकारी अभियंता एन.जी. गडपायले यांनी यावेळी दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.