spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जीवघेण्या हल्ल्यात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; आरोपीवर खुनाचा गुन्हा

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारे कॉलोनी येथे प्रेमसंबंधाच्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. या प्रकरणी आधी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपी पित्याविरुद्ध आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुणाचे नाव जमशेर उर्फ जम्मू मुनीर खान पटेल (वय २३, रा. जुनी खलासी लाईन, बंगाली कॉलनी, कामठी) असे असून आरोपीचे नाव विजय उर्फ टायसन नामदेव डोंगरे (वय ५२, रा. कुंभारे कॉलनी, कामठी) असे आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी १८ जुलैच्या उशिरा रात्री जमशेर हा आरोपीच्या घरी गेला असता प्रेमसंबंधाच्या वादातून संतप्त झालेल्या आरोपी पित्याने लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर जखमी तरुण घटनास्थळावरून पळून जात असताना आरोपीने ऑटोरिक्षाने त्याचा पाठलाग करून धडक देत त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केला मात्र, जमशेरने कसाबसा जीव वाचवत तेथून सुटका करून घेतली आणि उपचारासाठी रुग्णालय गाठले.

गंभीर अवस्थेत त्याच्यावर कामठी येथील लाईफ लाईन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी अनेक दिवस झुंज दिल्यानंतर आज त्याची प्राणज्योत मालवली.

मृतदेहाचे शवविच्छेदन शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. जमशेरच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

पुढील तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.