संदीप कांबळे, कामठी :- कामठी शहर आणि तालुक्यात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी वाहने देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, हा प्रकार आता गंभीर सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न बनला आहे. शाळा व महाविद्यालये सुटल्यानंतर शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि उपनगरांमध्ये अल्पवयीन मुलांकडून भरधाव वेगाने दुचाकी चालविणे, तिघेजण बसून प्रवास करणे, हेल्मेटशिवाय वाहन चालविणे आणि धोकादायक स्टंटबाजी करणे नित्याचे चित्र बनले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार १८ वर्षांखालील व्यक्तीला वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे असतानाही अनेक पालक मुलांच्या हट्टापोटी किंवा सोयीसाठी त्यांच्या हातात दुचाकीची चावी देत आहेत. ही निष्काळजीपणा केवळ कायद्याचे उल्लंघन नसून मुलांच्या भवितव्याशी आणि इतरांच्या जीवाशी खेळ करणारी बाब असल्याचे मत आहे.
कामठीतील शाळा परिसर, बाजारपेठ, कळमना मार्ग, नवीन कामठी, जुनी कामठी,पोरवाल कॉलेज, रणाळा, येरखेडा ,रमानगर उडानपुल आणि इतर प्रमुख मार्गांवर अल्पवयीन वाहनचालकांची संख्या लक्षणीय वाढल्याचे चित्र आहे. अनेकदा हे विद्यार्थी , भरधाव वेगाने वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे,स्टंटबाजी करणे,ट्रिपल सीट चालविणे, अशा प्रकारांमुळे मोठ्या अपघातांना निमंत्रण देत आहेत.
विशेष म्हणजे, अपघात झाल्यानंतर केवळ अल्पवयीन चालकच नव्हे, तर संबंधित वाहन मालक आणि पालकांवरही कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. तरीदेखील या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अल्पवयीन चालक आणि त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
मुलांना वाहन देणे म्हणजे प्रेम नव्हे, तर त्यांच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ आहे. त्यामुळे पालकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनांच्या चाव्या देणे टाळावे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय लावावी, असे आवाहन सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.





