spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निर्मल नगरीत देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलनामाचा अखंड गजर; हजारो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- उमरेड मार्गावरील निर्मल नगरी येथील, श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट च्यावतीने देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वावरील सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे पासूनच हजारो भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. संपूर्ण मंदिर परिसर “पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल”, “राम कृष्ण हरी”, “ज्ञानोबा- तुकाराम” या अखंड नामघोषाने दुमदुमून गेला. यावर्षी मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींची विविध प्रकारच्या फळे, फुले आणि आकर्षक सजावटीने मनमोहक आरास करण्यात आली होती. मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई आणि भक्तिमय वातावरणामुळे निर्मल नगरीत जणू विदर्भातील दुसरे पंढरपूर अवतरल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांपासून हा उत्सव भक्तिभावाने साजरा होत असून, दरवर्षी भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

भजन, कीर्तन, हरिनाम संकीर्तन आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती तसेच लहान मुलांनीही मोठ्या श्रद्धेने या धार्मिक सोहळ्यात सहभाग नोंदविला. पंढरीचा श्री विठ्ठल हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत मानला जातो. विठ्ठल, पांडुरंग, विठोबा, विठू माऊली, पंढरीनाथ, पंढरीराया अशा विविध प्रेमळ नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या सावळ्या परब्रह्माच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. भक्तांनी सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांनी दर्शनासाठी उत्कृष्ट नियोजन करून भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ दिली नाही. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना साबुदाणा खिचडी, उपवासाचे लाडू, केळी आणि खोवा जिलेबी यांचा महाप्रसाद वितरित करण्यात आला. या भक्तिमय आणि मंगलमय सोहळ्यामुळे निर्मल नगरी संपूर्ण दिवस विठ्ठलमय झाली असून, देवशयनी आषाढी एकादशीचा हा उत्सव भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

Popular Articles