spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‎प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये कारगिल विजय दिन उत्साहात; वीर जवानांच्या शौर्याला भावपूर्ण सलाम‎

नागपूर :- ‎प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगर येथे कारगिल विजय दिन देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्राभिमानाच्या प्रेरणादायी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अद्वितीय शौर्य गाजवत कारगिल युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना जागवली. ‎कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने झाली. त्यानंतर ‘ अमर जवान ‘ स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून वीर शहीदांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. संपूर्ण परिसर देशभक्तीपर घोषणांनी आणि राष्ट्रप्रेमाच्या वातावरणाने भारावून गेला.

यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले शौर्यवंत ब्रिगेडियर सुनील गावपांडे (निवृत्त) आणि कर्नल राजू पाटील (निवृत्त )यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाचे अनुभव अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी शैलीत मांडले. त्यांच्या मनोगतातून भारतीय सैनिकांचे शौर्य, कर्तव्यनिष्ठा, त्याग आणि मातृभूमीप्रती असलेले निस्सीम प्रेम यांचे जिवंत दर्शन घडले. ‎कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल सिद्धार्थ यांची उपस्थिती लाभली. तसेच सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. अशोक बन्सोड, उपाध्यक्ष भालचंद्र कागभट, सचिव विजय कागभट तसेच शाळेच्या प्राचार्या वंदना कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कारगिल विजय सप्ताह निमित्त संपूर्ण आठवडाभर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कारगिल विजयावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा, सायटेशन लेखन, स्लाईड शो आदी उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‎विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना भारावून टाकले. त्यानंतर सादर करण्यात आलेले देशभक्तीपर नृत्य, योगा आणि कराटे प्रत्यक्षिकाचे सादरीकरण यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. टाळ्यांचा कडकडाट आणि भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करणे, भारतीय सैन्याविषयी आदर निर्माण करणे, लष्करी सेवेची प्रेरणा देणे आणि वीर जवानांच्या अतुलनीय बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून तो प्रभावीपणे साध्य झाला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मृणाल काटे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची गौरवपूर्ण सांगता करण्यात आली. याप्रसंगी सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे प्राचार्य, शिक्षकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी वीर जवानांच्या शौर्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत त्यांच्या बलिदानाप्रती आदर व्यक्त केला.

Popular Articles