spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणुकांना तूर्तास ब्रेक

– राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी स्थगित केल्याने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर; इच्छुक उमेदवारांच्या तयारीवर पाणी

संदीप कांबळे,कामठी :- कामठी तालुक्यातील आगामी १० ग्रामपंचायत निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे तूर्तास ब्रेक लागला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणारी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ऐनवेळी स्थगित करण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता बळावली असून इच्छुक उमेदवारांसह ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.

कामठी तालुक्यातील लोणखैरी, टेमसना, भामेवाडा, महालगाव, केसोरी, घोरपड, कोराडी, पावनगाव, पांजरा आणि खेडी या दहा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्याने निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. अनेक इच्छुक उमेदवारांनी प्रचारयंत्रणा सक्रिय केली होती, तर गावागावात राजकीय घडामोडींनाही वेग आला होता. मात्र आयोगाच्या अचानक निर्णयामुळे सर्व हालचालींना एका क्षणात ब्रेक लागला.

राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. त्यानंतर हरकतींची छाननी करून ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र कोणतेही सुधारित वेळापत्रक जाहीर न करता आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया स्थगित केल्याने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, मतदार यादी, प्रभागनिहाय आरक्षण, उमेदवारीची चाचपणी आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर सुरू असलेल्या चर्चांना या निर्णयामुळे अचानक विराम मिळाला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असतानाच आयोगाच्या या निर्णयाने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आता राज्य निवडणूक आयोग सुधारित वेळापत्रक कधी जाहीर करणार आणि ग्रामपंचायत निवडणुकांचा नवा कार्यक्रम कधी निश्चित होणार, याकडे संपूर्ण कामठी तालुक्याचे लक्ष लागले असून गावागावात त्याबाबत उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे.

Popular Articles