spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लाखनीत काँग्रेसचा कँडल मार्च पेपरफुटीचा निषेध करत दोषींवर कारवाईची आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेची मागणी

हंसराज भंडारा लाखनी :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लाखनी येथे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर कँडल मार्च आणि सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. कच्ची मेमन हॉल ते महाप्रज्ञा बुद्धविहार या मार्गावर काढण्यात आलेल्या या आंदोलनात विद्यार्थी, युवक, पालक आणि काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साकोलीचे आमदार नाना पटोले, भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे आणि भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद विनोद साखरकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत उपस्थितांना संबोधित केले.

देशातील शिक्षण व्यवस्था पारदर्शक, जबाबदार आणि विद्यार्थीहिताची राहावी यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करत राहील, अशी भूमिका नाना पटोले यांनी यावेळी मांडली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उभा राहिलेला हा संघर्ष संविधानाच्या शक्तीमुळे यशस्वी झाल्याचे सांगून, हा विजय देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार प्रशांत पडोळे यांनी संसदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवल्याचा संदर्भ देत, पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. या प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

जिल्हाध्यक्ष मुकुंद विनोद साखरकर यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध केला. आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. नीट (NEET) पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले असून, या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थी आणि युवकांची जाहीर माफी मागावी, असेही साखरकर यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात मेणबत्त्या प्रज्वलित करून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तालुका, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय आणि महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles