– घोडा, बग्गी, डीजेच्या तालात निघाली वरात
सचिन चौरसिया, रामटेक :- चांगला पाऊस पडावा यासाठी काही ठिकाणी बेडका-बेडकीचं लग्न लावलं जाण्याची प्रथा आहे. पण आता पावसाला आमंत्रण देण्यासाठी रामटेक येथे चक्क बाहुला -बाहुलीचे लग्न लावण्यात आले आहे. मंडप सजला, डीजेच्यासह वऱ्हाडी आले आणि लग्न घटिका समीप येताच सर्वत्र उत्साह संचारला. रामटेक शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पाडला. वरूण राजाला पावसासाठी साकडे घालून पावसाची प्रतीक्षा संपवावी म्हणून या पार्श्वभूमीवर गुरूवारी अखाडी पुजेनिमित्त शहरातील सामाजिक कार्यकर्ते आकाश ढोबळे यांच्या नेतृत्वात काही लोकांनी पुढाकार घेतबाहुला बाहुलीचा स्वयंवर आयोजित करण्यात आला. एक दिवसापुर्वी बुधवारी हळदीचा कार्यक्रम आटोपला. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता लग्न सोहळ्याची संपूर्ण तयारी केली. छोट्याशा मंडपाखाली छोटासा स्टेज सजवण्यात आलेला होता. निमंत्रीत पाहुण्यांची हजेरी लागली होती. घोडा तथा आकर्षक रोषणाईने सजवलेली बग्गी बोलवण्यात आलेली होती. सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान डिजे च्या तालात थाटात वरात निघाली. वऱ्हाडी महिला, पुरुष तथा बालगोपाल थिरकत होते. लग्नसोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे. वरात महात्मा फुले वार्ड येथून निघाली. ती जोड मारोती मंदीर मार्गे, गांधी चौक होत नगर परिषद मार्गे परत महात्मा फुले वार्ड येथे लग्नमंडपात पोहोचली. मंगलाष्टके झाली व विवाहसोहळा थाटात पार पडला. वऱ्हाड्यांना स्नेहभोजन देण्यात आले. नान्होऱ्याचा कार्यक्रम आम्ही उरकवला असे आयोजकांनी सांगितले. लग्नसोहळ्याचे आयोजन देवानंद वाडीभस्मे, आकाश ढोबळे, रवींद्र जिल्हारे, आशीष कावळे, रवी कटारे, जोगेंद्र शिरोडे, प्रणय वाडीभस्मे तथा नंदकिशोर लोखंडे यांनी केलेले होते.





