– सौंदड येथे घरझडतीत ५८.५६६ किलो हिरवा ओलसर गांजा हस्तगत; एका महिलेविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सडक अर्जुनी तालुक्यातील सोंडद येथे छापा टाकून ५८.५६६ किलो हिरवा ओलसर गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ₹५ लाख ८४ हजार ६०० इतकी असून, या प्रकरणी अनिता अशोक मोहनकर (वय ५३, रा. फुताळा, सौंदड ता. सडक अर्जुनी) यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) अंतर्गत दुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २६ जुलै रोजी दुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सौंदड येथील संबंधित घरावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून छापा टाकण्यात आला.
झडतीदरम्यान घरातील एका प्लास्टिकच्या पोत्यात ठेवलेले हिरव्या रंगाची पाने, फुले व बिया मिश्रित गांजाचे बंडल आढळून आले. पंचनामा करून पोलिसांनी ५८.५६६ किलो हिरवा ओलसर गांजा जप्त केला. त्यानंतर आरोपी महिलेला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी दुग्गीपार पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास दुग्गीपार पोलीस ठाण्याकडून सुरू असून, अमली पदार्थांच्या साखळीतील इतर संबंधितांचा शोधही घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक जंगमवार, पोहेवा तुलसीदास लुटे, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, पोशि सुनील डाहके, राकेश इंदूरकर तसेच चापोशि विलास ठाकरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
अमली पदार्थांविरोधात पोलिसांची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका
गोंदिया जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे धोरण पोलीस प्रशासनाने अवलंबले आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना गोपनीयरीत्या द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून, जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.





