– फील द बर्न फिटनेसच्या वर्धमान नगर शाखेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर :- नागपूरकरांना जागतिक दर्जाच्या फिटनेस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फील द बर्न फिटनेसच्या अत्याधुनिक व प्रीमियम वर्धमान नगर शाखेचे उद्घाटन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भंडारा रोडवरील मेहता पेट्रोल पंपासमोर उभारण्यात आलेल्या सुमारे ७ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या आधुनिक जिममध्ये जागतिक दर्जाची प्रीमियम फिटनेस उपकरणे, अनुभवी प्रशिक्षक, अत्याधुनिक सुविधा, आईस बाथ, स्टीम रूम तसेच आकर्षक इंटेरिअरसह सर्वसमावेशक फिटनेस अनुभव उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच मुलांसाठीही ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उद्घाटनप्रसंगी शिला विष्णूगोपाल जयस्वाल, आशिष व प्रिया जयस्वाल, अभिषेक व अंकिता जयस्वाल, तसेच स्वस्तिक, आरव आणि आद्विका यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘फील द बर्न फिटनेस’चे संस्थापक आशिष जयस्वाल व अभिषेक जयस्वाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया मिशन’ला पाठिंबा देत नागपूरमध्ये दर्जेदार फिटनेस संस्कृती रुजविण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, सहा वर्षांपूर्वी साखरदरा येथे सुरू झालेल्या पहिल्या शाखेला १,००० हून अधिक सदस्य असून दररोज सुमारे ५०० नागरिक नियमित व्यायामाचा लाभ घेत आहेत. वर्धमान नगर येथील ही त्यांची दुसरी शाखा असून नागपूरकरांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला नवी दिशा देण्याचे उद्दिष्ट आहे. अभिषेक जयस्वाल हे व्यापारी आघाडी दक्षिणचे अध्यक्ष असून उद्घाटन सोहळ्यास व्यापारी आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अशी माहिती व्यवस्थापक कुलदीप चिकाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.





