यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात जुन्या प्रेमसंबंधातून विवाहित महिला आणि पुरुषाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मानोली शिवारात सोमवारी सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार, दोघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मृतांची ओळख गणेश ढोले (वय ३६, रा. मानोली, ता. घाटंजी) आणि अंजली मीना (वय ३२, रा. रामपूरा, राजस्थान) अशी झाली आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी अंजली कामानिमित्त मानोली येथे आली असताना तिची गणेशशी ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. काही काळानंतर दोघे वेगळे झाले आणि अंजली राजस्थानला परतली. त्यानंतर दोघांचाही स्वतंत्रपणे विवाह झाला व ते आपल्या संसारात रमले.
अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचा पुन्हा संपर्क झाला. त्यानंतर अंजली दोन दिवसांपूर्वी राजस्थानहून मानोली येथे गणेशला भेटण्यासाठी आल्याचे सांगितले जाते. यामुळे गणेशच्या कुटुंबात वाद निर्माण झाला. त्यानंतर रविवारी रात्री दोघे घरातून बाहेर पडले.
सोमवारी सकाळी मानोली शिवारातील शेतात दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी विषारी द्रव्याचे अवशेष आढळल्याने विषप्राशनाची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. दोघांनाही प्रत्येकी दोन लहान मुले असून, या घटनेचा त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा परिणाम झाला आहे.
घाटंजी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.





