अमरावती २ : अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गुरुकृपा कॉलनीत शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या आशा घुले (वय 38) या महिला पोलीस कर्मचाऱ्याची त्यांच्या राहत्या घरी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या वेळी आशा घुले यांचे पती जे SRPF (राज्य राखीव पोलीस बल) मध्ये कार्यरत आहेत, ते ड्युटीवर होते. आशा घुले यांचा मृतदेह घरी संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यांच्या गळ्यावर तीव्र जखम व गळा दाबल्याचे स्पष्ट चिन्ह दिसून आल्याने ही हत्या असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे, एसीपी, तसेच फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला असून परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत.
या घटनेमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ माजली आहे. हत्या कोणी केली आणि नेमका उद्देश काय होता, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पोलीस सर्व शक्यतेने तपास करत असून लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळण्याची शक्यता आहे.








