यवतमाळ, प्रतिनिधी संजय कारवटकर २ : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शिवसेना पक्षाने पश्चिम विदर्भ विभागासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, यवतमाळ येथील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे विश्वासू सहकारी पराग उमाकांत पिंगळे यांची शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ समन्वयकपदी नियुक्ती केली आहे.
ही नियुक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारधारेच्या आधारावर, आणि पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. या नियुक्तीचा अधिकृत नियुक्ती पत्र शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांनी ३० जुलै रोजी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून जारी केले. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्ष मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंगळे यांना नियुक्तीपत्र दिले.यापूर्वी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची शिवसेनेचे विदर्भ संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पक्षाने त्यांना सहकार्य करण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने पराग पिंगळे यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी टाकली. पराग पिंगळे यांच्यावर पक्ष संघटन, विचारप्रसार आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी असेल. पक्षाचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा विचार आणि कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पराग पिंगळे करणार आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांची काम करण्याची चळवळीची वृत्ती, लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आदी भागात शिवसेनेच्या संघटनेला नवे बळ मिळणार असून, पक्षवाढीसाठी एक नवा दिशा आणि गतिशीलता मिळेल, अशी अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे.
पराग पिंगळे यांनी या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना, शिवसेनेने दाखवलेला विश्वास माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. पक्षवाढ आणि विचारप्रसारासाठी मी माझं शंभर टक्के योगदान देईन.ना संजय राठोड यांचे मार्गदर्शनात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर शिवसेनेच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे काम मी प्रामाणिकपणे करणार आहे, असे सांगितले.
या नियुक्तीचे श्रेय त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना दिले. नियुक्तीबद्दल त्यांच्यावर महाराष्ट्रभरातून व विशेषतः पश्चिम विदर्भातील विविध कार्यकर्त्यांकडून, स्थानिक नेतृत्वाकडून आणि जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




