कामठी २ : शुक्रवार दिनांक ०१ ऑगस्ट रोजी कामठी तालुक्यातील आजनी येथील ग्रामस्थांनी ग्राम पंचायत पदाधिकारी आणि पब्लिक टू पीएम न्यूज चॅनेल यांच्या मार्गदर्शनाखाली कामठी गुमथळा मार्गावर कामठी नगर परिषद कामठी द्वारा उभारण्यात आलेले डम्पिंग यार्ड हटवण्यासाठी नगर परिषद विरोधी घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कामठी तालुक्यातील ग्रामस्थ या डम्पिंग यार्ड विरूद्ध लढा देत आहेत. कामठी शहरातील संकलित केलेला घनकचरा या ठिकाणी टाकण्यात येत असला तरी डम्पिंग यार्ड भरल्यामुळे तो रहदारीच्या रस्त्यावर येत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतो आहे. तसेच या कचऱ्यावर उपद्रवी जीव वाढले असून त्यामुळे अपघात घडण्याची संभावना वाढलेली आहे. येथेच मृत पशू आणि दवाखान्यातील जैविक कचरा सुद्धा टाकला जातो. आज सकाळी सुद्धा याठिकाणी घंटागाड्यांनी रस्त्यावर कचरा आणून टाकला आहे.
यासंबंधी यापूर्वीच तहसीलदार, पोलिस स्टेशन, नगर परिषद, स्थानिक आमदार, कलेक्टर, प्रदूषण मंडळ, आदी सर्वांना निवेदन दिल्या गेले आहेत. अनेक न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांत याविषयी बातम्या झळकल्या आहेत. तरीसुद्धा यावर कुठलीच कारवाई झालेली नाही.
अनेकदा हा कचरा जाळला जात असल्याने त्यातून निघणारा धूर ग्रामस्थांच्या घरांत शिरत असल्याने गुदमरायला होत आहे. या डम्पिंग यार्डचा त्रास शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि शहरात ये जा करणाऱ्या सर्वांना होत असल्याने आणि प्रदूषण वाढतच असल्याने आज संतप्त गावकऱ्यांनी नगर परिषदेविरुद्ध घोषणा देत यार्डजवळ आंदोलन केले.
या आंदोलनात आजनी ग्राम पंचायतीचे सचिव आतिश देशभ्रतार, सरपंच संजय भाऊ जीवतोडे, उपसरपंच हेमराजजी दवंडे, सदस्य अनिकेत इंगोले, गायत्री हरणे, हेमलता उकेबोंदरे, श्वेता चौधरी, अंकिता हेटे सह सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ रडके, लीलाधर दवंडे, नरेश जीवतोडे, विनोद वाट, विक्की घोडे,राजू लायबर, श्रीकांत लोहकरे, नीरज रडके, नारायण वैद्य, नितीन ढोले, सचिन ढोले, रितेश उकेबोंदरे, गजेंद्र ढोक, अनुराग रडके, श्रवण लाडस्कर, सुमित भोयर, दर्पण घोडे, शुभम वाणी, निखिल सुरपाम, भीमराव नागोसे, शुभम भोने, ऋषिकेश गीऱ्हे, रुपेश चमेले, रवींद्र पटले, अरुण भाऊ, विक्की वाणी, भावेश हेटे, अभिषेक फुकट, आदित्य मोहोतकार, दिनेश मेश्राम, योगराज नागपुरे, बिंदू गणवीर, प्रिया चिपडे, आशिष सोनेकर, राहुल नागोसे, कपिल मारबते, लंकेश सलामे, कृष्णा ठाकरे, उत्तम ढोक, रोहित जीवतोडे यांच्यासह नवयुवक युवा मंडळ, वीर बजरंग क्रीडा मंडळ, जय बजरंग क्रीडा मंडळ आणि रेणुका क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नगर परिषदेने डम्पिंग यार्डसंबंधी कुठला निर्णय न घेतल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
धोबी नाला डम्पिंग यार्ड हटविण्याबाबत आंदोलन









