· नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीला गती
मुंबई :- राज्यातील गोंदिया, नंदुरबार, अलिबाग, बुलढाणा, जालना, धुळे आणि हिंगोली येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांच्या उभारणीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने वेगाने सुरू असून या सर्व प्रकल्पांचा नियमित आढावा घेऊन कामांतील अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. राज्याच्या प्रत्येक भागात आधुनिक आरोग्य सुविधा आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत गोंदिया, नंदुरबार, अलिबाग, बुलढाणा, जालना, धुळे आणि हिंगोली येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकाम प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी तसेच संबंधित महाविद्यालयांचे अधिष्ठाता दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामाची भौतिक प्रगती सुमारे ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून आवश्यक सुधारित आराखडा शासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालय अधिक आधुनिक आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उभारण्यात येत असून पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांबाबत आवश्यक कार्यवाही वेगाने सुरू आहे.
नंदुरबार येथील १०० विद्यार्थी क्षमतेच्या वैद्यकीय महाविद्यालय व ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या प्रकल्पाची भौतिक प्रगती जवळपास ४९ टक्क्यांपर्यंत झाली असून पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व वसतिगृहांच्या बांधकामातही सातत्याने प्रगती होत असून विविध इमारतींच्या संरचनात्मक कामांना गती देण्यात आली आहे.
बुलढाणा, जालना, धुळे आणि हिंगोली येथील प्रकल्पांमध्येही बांधकाम नियोजनानुसार सुरू आहे. आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, पाणीपुरवठा योजना, विद्युत जोडणी, फर्निचर आणि इतर सुविधा वेळेत उपलब्ध करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “राज्यातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासाठी दूर जावे लागू नये, हा राज्य शासनाचा उद्देश आहे. त्यामुळे सर्व प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत आणि उच्च दर्जा राखून पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रकल्पांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पे लवकरात लवकर पूर्ण करावीत.”
प्रत्येक प्रकल्पातील भौतिक व आर्थिक प्रगती, निधी उपलब्धता, पाणीपुरवठा, वीज, फर्निचर, आवश्यक परवानग्या तसेच इतर पायाभूत सुविधांचा तपशीलवार आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिले.





