spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राजधानीत दर्जेदार चित्रपटांची मेजवानी

– ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा  सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांच्याकडून आढावा

नवी दिल्ली :- राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज महाराष्ट्र सदन येथे झालेल्या बैठकीत देशाच्या राजधानीत प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आणि नियोजनाचा आढावा घेतला. दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे जनपथ येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये 7 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीची सांस्कृतिक समृद्धी राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे.

या बैठकीस महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल , दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, विवेक गर्गे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी नितीन सरदारे, अभिजित गोडबोले, रामदास चव्हाणके आणि राजकुमार महाजन उपस्थित होते. चित्रपट प्रदर्शन, मान्यवरांचे स्वागत, प्रेक्षक व्यवस्थापन, नोंदणी प्रक्रिया, तांत्रिक सुविधा, प्रसिद्धी, सुरक्षा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन या सर्व बाबींचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. महोत्सवाचे आयोजन उच्च दर्जाचे आणि संस्मरणीय व्हावे, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी संबंधितांना दिल्या. दिल्लीच्या सांस्कृतिक विश्वात मराठी चित्रपटसृष्टीचा ठसा अधिक ठळक करणारा आणि मराठी सिनेमाला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात हा महोत्सव यशस्वी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘सिनेमा • संस्कृती • संवाद’ या संकल्पनेवर आधारित हा तीन दिवसीय महोत्सव मराठी चित्रपटांच्या आशयवैविध्याची ओळख देशभरातील रसिकांना करून देणारा ठरणार आहे. महोत्सवाची सुरुवात बहुप्रतीक्षित ‘देऊळ बंद -2’ या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाने होणार असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळविलेल्या ‘स्थळ’, ‘घबाडखुंड’ यांसह विविध दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. इतर भाषिक प्रेक्षकांनाही मराठी चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी सर्व चित्रपट इंग्रजी उपशीर्षकांसह दाखविण्यात येणार आहेत.

चित्रपट प्रदर्शनाबरोबरच चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे. भीम सभागृहात उद्घाटन, समारोप आणि प्रमुख चित्रपटांचे प्रदर्शन होईल, तर नालंदा सभागृहात पटकथा लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन या विषयांवरील मास्टरक्लास आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. समरसता सभागृहात माहितीपट आणि लघुपटांचे प्रदर्शन होणार असून, मराठी चित्रपटसृष्टीच्या विविध पैलूंवर चर्चासत्रेही आयोजित करण्यात येणार आहेत.

महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असला तरी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. 29 जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, अधिकृत संकेतस्थळ अथवा क्यूआर कोडच्या माध्यमातून रसिकांनी आगाऊ नोंदणी करून आपले स्थान निश्चित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.