spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इम्पॅक्ट’: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रेती वाहतुकीला ‘ब्रेक’; लाखांदूर तहसीलदारांचे कडक निर्बंध

– शालेय वेळेत वाहतूक बंद ठेवण्याचे कंत्राटदाराला आदेश; चिखलामुळे बस बंद पडल्याची प्रशासनाकडून गंभीर दखल

हंसराज,भंडारा लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रातून होणाऱ्या बेसुमार आणि ओव्हरलोड रेती वाहतुकीने ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः दैना केली असून, गावराळा-मोहरणा मार्गावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अवजड ट्रकांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्यांची चाळण झाल्याने मागील काही दिवसांपासून या मार्गावरील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, नोकरदार आणि शेतकऱ्यांना बसत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत लाखांदूर तहसीलदारांनी अखेर कडक पवित्रा घेतला असून, शालेय वेळेत रेती वाहतूक बंद ठेवण्याचे लेखी आदेश संबंधित कंत्राटदाराला बजावले आहेत.

तहसीलदार कार्यालयाने ‘ए.बी. कॅरिअर्स डायनॅमिक प्रा.लि.’ या कंपनीला दिलेल्या आदेशानुसार, पावसाळ्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि साचलेल्या चिखलामुळे शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत रेतीची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास किंवा शालेय वेळेत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास सर्वस्वी कंत्राटदाराला जबाबदार धरून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, केवळ वेळेचे निर्बंध लादणे पुरेसे नसून, ओव्हरलोड वाहतुकीवर कायमस्वरूपी आळा घालावा आणि उद्ध्वस्त झालेले रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करावेत, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे बस बंद पडल्याने ग्रामीण भागात संतापाची लाट असून, तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. आता तहसीलदारांच्या या आदेशानंतर तरी कंत्राटदार नियमांचे पालन करतो का आणि रस्ते दुरुस्त होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles