नागपूर :- राज्यातील बहुतांश भागाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं असून अनेक भागात पावसाने रौद्ररूप धारण केल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आज (1 ऑगस्ट) देखील राज्यात पावसाचा जोर कायम असून विदर्भ, मराठवावाडा मध्य महाराष्ट्र्र, कोकणसह घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले असून काही गावांचा संपर्क तुटल्याची देखील माहिती आहे. तर तिकडे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. संभाव्य पावसाचा इशारा लक्ष्यात घेता नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच 13 तालुक्यात अतिवृष्टी झाली असून सरासरी 130 मीमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वात जास्त जळगाव जामोदमध्ये 208 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पूर्णा नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. तर अनेक गावात अद्यापही पाणी बघायला मिळत आहे. काल बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सर्वात जास्त पाऊस हा जळगाव जामोद तालुक्यात तीन तासात 208 मिलिमीटर पाऊस बरसला, त्या पाठोपाठ नांदुरा तालुक्यात 174 मिलिमीटर पाऊस बरसला. या तुफान पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं.
पूर्णा नदीला पूर, बुलढाणा, अकोला अमरावतीसह वाशिम जिल्ह्याला पुराचा फटका
दरम्यान, अकोला अमरावती व वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्णा नदीला मोठा पूर आलाय. पुराचे पाणी नदीपात्राच्या बाहेर जाऊन शेतात शिरल्याने शेतीचही मोठं नुकसान झालं आहे. सध्या ही पूर्णा नदीने रौद्ररूप धारण केलेलं असून नदीकाठील अनेक गावात अद्यापही पाणी असल्याचं बघायला मिळत आहेत.
नागपूर मुंबई महामार्गावर मुसळधार पावसाचा फटका उड्डाण पुलाचा भराव खचला
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. यावेळी मुंबई नागपूर महामार्गावर पाळधी-तरसोद बायपास रस्त्यावरील उड्डाणपुलाचा भराव पावसामुळे खचला आहे. रेल्वे उड्डाण पुलाजवळील ही घटना आहे. जळगाव तालुक्यातील असोदापासून पुढे भुसावळकडे चढताना हा पूल असून त्याचा भराव खचला आहे. काही दिवसापूर्वीच या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते मात्र पावसामध्ये या रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र बघाव्यास मिळत आहे
यवतमाळ जिल्ह्यात 24 तासांत 135 मिमी पाऊस
यवतमाळ जिल्ह्यात अवघ्या 24 तासांत कोसळलेल्या 135 मिमी मुसळधार पावसाने जिल्ह्यात अक्षरशः झोडपून काढले. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. नदी नाल्या काठावरील अंदाजे 400 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील तब्बल 98 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे 518 घरांचे नुकसान झाले. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने कापूस, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतकर्यांचे सिंचन साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले असून, पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. पुराच्या तडाख्यात जनावरांनाही मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत 97 शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.





