spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दिल्ली पोलिसांच्या नावाने AI बनावट व्हिडिओ प्रकरण : भाई जगताप यांच्याविरोधात गुन्हा

मुंबई :- दिल्ली पोलिसांचे DCP सुमित झा यांच्या नावाने AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0063/2026 नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भामरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. FIR नुसार, @Bhaijagtap1 या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचा भास निर्माण करणारा AI-निर्मित व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. प्राथमिक पडताळणीत हा व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आले असून, समाजात संभ्रम निर्माण करणे आणि जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तो प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, PIB Fact Check आणि दिल्ली पोलिसांनीही संबंधित व्हिडिओ AI-जनरेटेड आणि पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. DCP सुमित झा यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ खोटा असल्याचे अधिकृत यंत्रणांनी सांगितले असून, नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या सामग्रीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी भाई जगताप यांनी तात्काळ संबंधित व्हिडिओ हटवून जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. जाणूनबुजून खोटी माहिती प्रसारित करून समाजात संभ्रम निर्माण करणे हा गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, फेक AI व्हिडिओच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.