नागपूर ५ :- तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करु नये यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली असल्याची माहिती तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात दिली आहे. कंत्राटी कामगारांनी विज कंपनीच्या कामकाजामध्ये महत्वाची भुमिका सदैव बजावली आहे. त्यांनी कर्तव्याप्रति निष्ठा व समर्पन सिध्द केले आहे. त्यांनी कंपनीच्या सेवेमध्ये आयुष्यातील १० ते १५ वर्ष घालवली आहे. त्यांचे सद्यस्थतीतील वय वर्ष हे ४० ते ५० या दरम्यान असल्याने त्यांचे कुटुंब कार्यरत असलेल्या रोजगारावर अवलंबुन आहे. नुकतीच महापारेषण व महावितरण कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत सहाय्यक पद भरती करण्यात आली आहे. नवनियुक्त विद्युत सहाय्यकांना पदस्थापना दिल्यानंतर जवळपास ८००० हजार कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करणार असल्याची माहीती मिळत आहे. त्यांच्या करीता संघटनेने वारंवारं विनंती केल्याप्रमाणे विशेष बाब म्हणुन त्यांना तिन्ही कंपनीमध्ये शास्वत रोजगारांची हमी देण्याकरीता निर्णय घेणे गरजेचे आहे.
तरी नवनियुक्त विद्युत सहाय्यक पदस्थापने नंतर कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात येवु नये तसेच कंत्राटी कामगारांना कायम करण्याकरीता “विशेष पद भरती मोहिम राबविण्यात यावी. मानवतावादी दृष्ट्रीकोण ठेवुन निर्णय घ्यावा अशी मागणी तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस प्रदीप पाटील, नितिन चव्हाण, अनिल चव्हाण, शेख राहिल, शंकर जारकड, अतुल पाटील, प्रताप खंडारे, धिरज घायवट, अनिवेश देशमुख, कुणाल जिचकार, मयुर कोठे, निलेश चक्रपाणी, निशांत काळसर्पे, विक्की पाचघरे, मंगेश चिमोटे, विलास कुमेरिया, जयपाल हटवार यांनी केली आहे.







