spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डासजन्य आजारांच्या सर्वेक्षणाला गती आतापर्यंत १४६५०९ घरांचे सर्वेक्षण : ७९८६ घरांमध्ये आढळला लारवा

 

नागपूर, ता. ५  :  शहरात डासांमुळे उद्भवणाऱ्या आजारांबाबत प्रभावी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे आशांद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे. झोन स्तरावर ‘ब्रिडिंग चेकर्स’द्वारे सुरु असलेल्या सर्वेक्षणाला आशांच्या सहभागामुळे गती मिळाली आहे. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सर्वेक्षणमध्ये आतापर्यंत १४६५०९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, यात ७९८६ घरांमध्ये डासांचा लारवा आढळून आला.

सध्या पारेषण काळ असल्यामुळे डासांमुळे उद्भवणारे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आढावा बैठकीमध्ये निर्देश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात आशा सेविकांद्वारे घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी मनपाच्या १०८८ आशा सेविका कार्यरत असून झोनस्तरावर प्रभागनिहाय त्यांच्याकडे सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

मनपा आशा सेविकांद्वारे शहरातील घरोघरी भेट देऊन घरातील डासोत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यात येतो. कुलरची टाकी, कुंड्या, भांडी, ड्रम, खराब तयार, घराच्या छतावर ठेवलेल्या टाकाऊ पण पाणी जमा होऊ शकणाऱ्या वस्तू ही सर्व साधने डासोत्पत्तीसाठी कारणीभूत आहेत. या वस्तूंमध्ये पाणी जमा राहिल्यास त्यात आठवडाभरातच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचे डास तयार होऊ शकतात व त्यामुळे धोका निर्माण होतो. मनपाचे ‘ब्रिडिंग चेकर्स’ आणि आशा सेविका घरोघरी भेट देऊन अशी डासोत्पत्ती स्थाने शोधतात व लारवा आढळल्यास तो नष्ट करण्याची कार्यवाही केली जाते. मनपाद्वारे नियमितपणे शहरात झोनस्तरावरून धूर फवारणी वाहन आणि मनुष्यबळाद्वारे फवारणी आणि स्प्रेइंग केली जाते. शिवाय नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत देखील जनजागृती केली जाते.

यासोबतच शहरातील वस्त्या, मोकळे भूखंड आणि घरोघरी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर देखील भर दिला जात आहे. परिसरात आढळलेल्या डासांचे देखील परीक्षण करून ते कुठल्या आजाराचे संप्रेरक आहेत याची देखील शहानिशा केली जाते. परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी आणि स्प्रेइंग केली जाते. खुल्या भूखंडामध्ये पाणी साचलेले आढळल्यास तिथे डास अळीनाशक तेल (एमएलओ ऑईल) टाकून डास अळी नष्ट करण्याची कार्यवाही केली जाते.

मनपाच्या दहाही झोनमध्ये ९५ ‘ब्रिडिंग चेकर्स’ कार्यरत असून सर्वेक्षणाला गती देण्यासाठी आता १०८८ आशा सेविका देखील कार्यरत करण्यात आलेल्या आहेत. १ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘ब्रिडिंग चेकर्स’नी २०८७६ घरांचे सर्वेक्षण केले त्यातील ८५३ घरांमध्ये लारवा आढळला. तर या दोन दिवसांत आशा द्वारे १२५६३३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यातील ७१३३ घरांमध्ये डासांचा लारवा आढळून आला. याशिवाय ‘ब्रिडिंग चेकर्स’ व आशा सेविकांद्वारे घरांमधील कंटेनर (डासोत्पत्ती होणारी साहित्य) सर्वेक्षण करण्यात आले. यात ‘ब्रिडिंग चेकर्स’ ने २६९९२ कंटेनरची तपासणी केली त्यातील ४१५ दूषित आढळून आली. तर आशा सेविकांद्वारे ४९६८८ कंटेनरची तपासणी करण्यात आली असून त्यातील २१६० कंटेनरमध्ये लारवा आढळून आला. ‘ब्रिडिंग चेकर्स’  व आशांद्वारे एकूण ७६६८० कंटेनरची तपासणी केली असून त्यातील २५७५ घरे दूषित आढळली.

शहरात १ जुलै २०२५ पासून आजपर्यंत डेंग्यूचे ९ आणि चिकन गुनियाचे ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शहरात डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्वाचे आहे. नागरिकांनी त्यांच्या घरी सर्वेक्षाणासाठी येणारे मनपाचे ‘ब्रिडिंग चेकर्स’ व आशा सेविका यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी  केले आहे.

Popular Articles