spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उड्डाणपूल उभारण्यासाठी आमदार राजू तोडसाम यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

पांढरकवडा :- जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ (नवीन क्रमांक ४४) वरील पांढरकवडा शहरातील पिंपरी रोडजवळील नाल्यापासून ते टोलनाक्यापर्यंत उड्डाणपूल उभारण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार तोडसाम यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पांढरकवडा शहरातून वाराणसी ते कन्याकुमारी जोडणारा जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ व नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ जात असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यातच पांढरकवडा शहराची वाढती लोकसंख्या आणि शहरातून जाणारा महामार्ग हा वाहतुकीसाठी मुख्य प्रवेशरस्ता असल्याने या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे.

या मार्गावर यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या असून, भविष्यातही अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पांढरकवडा शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी पिंपरी रोडजवळील नाल्यापासून टोलनाक्यापर्यंत उड्डाणपूल उभारणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पांढरकवड्यातून घाटंजी तालुका तसेच पांढरकवडा-यवतमाळ मार्गावर जाणाऱ्या वाहनांना सदर उड्डाणपुलामुळे अधिक सुलभ व सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करून उड्डाणपुलाच्या बांधकामास तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी केली आहे.

पिंपरी रोडजवळील नाल्यापासून टोलनाक्यापर्यंत उड्डाणपूल मंजूर झाल्यास पांढरकवडा शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि जड वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार का, याकडे पांढरकवडा शहरासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles