– आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने दाभा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी
नागपूर :- दाभा परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या शाळेचा आज पहिला शैक्षणिक दिवस होता.
शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकले विद्यार्थी आपल्या पालकांसोबत मोठ्या उत्साहाने शाळेत दाखल झाले. नवीन शाळा, नवीन वर्ग, नवीन शिक्षक आणि नव्या शैक्षणिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लढ्ढा यांनी उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करण्याचे, शाळेतील प्रत्येक संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेऊन त्यांना सातत्याने प्रोत्साहन द्यावे, असे मार्गदर्शन केले.

“दाभा परिसरातील प्रत्येक मुलाला चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा महानगरपालिकेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. इंग्रजी माध्यमाच्या या नवीन शाळेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळच उत्तम शिक्षणाची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त, कौशल्यविकास आणि आत्मविश्वास वाढविण्यावरही भर दिला जाईल,” असे शिक्षण विशेष समिती सभापती संतोष देवी लढ्ढा यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे मुख्य संयोजक सोमसुर्व चॅटर्जी तसेच आकांक्षा फाउंडेशनचे प्राचार्यगण, शिक्षकवृंद आणि संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिका व आकांक्षा फाउंडेशन यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. दाभा परिसरातील अनेक पालकांसाठी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची इच्छा असते. मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उपलब्धता आणि आर्थिक बाबी यामुळे अनेक वेळा अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेली ही इंग्रजी माध्यमाची शाळा विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करून त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि पालकांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हे या नव्या शैक्षणिक उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. दाभा परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू झालेल्या या नव्या शैक्षणिक प्रवासाला शिक्षण सभापती संतोष देवी लढ्ढा यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळेच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण आणि उत्तम भविष्याची संधी मिळावी, हेच आपले ध्येय आहे,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





