spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अखंड भारत संकल्प दिनानिमित्त नागपुरात भव्य बाइक रॅलीचे आयोजन

नागपूर :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल तसेच माई फाउंडेशन व माई ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त नागपुरात भव्य बाइक व कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या अखंड भारताच्या संकल्पनेला पुढे नेत देशभरात १४ ऑगस्टपासून अखंड भारत संकल्प सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नागपुरात विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष डॉ. मोतीलाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली.

रॅलीचा प्रारंभ मनीषनगर येथील माई ग्रुप कार्यालयासमोर सकाळी १० वाजता भारतमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आला. राष्ट्रगीतानंतर कार्यकर्ते मनीषनगर टी- पॉइंटपर्यंत पायी चालत गेले. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’ अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर तिरंगा आणि अखंड भारताचा भगवा ध्वज हातात घेऊन बाइक व कार रॅलीला सुरुवात झाली. देशभक्तीपर गीतांच्या तालावर सहभागी कार्यकर्त्यांनी उत्साहात रॅली काढली.

मनीषनगर उड्डाणपूल, विमानतळ चौक, सोमलवाडा चौक, जयप्रकाशनगर, खामला मार्केट, रेडिसन ब्लू चौक, छत्रपती चौक, रहाटे कॉलनी, सीताबर्डी, झिरो माईल मार्गे संविधान चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी रॅलीला संबोधित करताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष डॉ. मोतीलाल चौधरी म्हणाले की, भारताला प्राचीन काळी जंबूद्वीप म्हणून ओळखले जात होते. विविध काळात परकीय आक्रमणांमुळे भारताचे भौगोलिक, सांस्कृतिक, वैचारिक व आर्थिक नुकसान झाले. देशाची अखंडता आणि स्वाभिमान टिकविण्यासाठी सम्राट विक्रमादित्य, महाराणा प्रताप, चक्रवर्ती सम्राट राजाभोज, राणी दुर्गावती, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, शहीद भगतसिंग, वीर सावरकर, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांच्यासह अनेक महापुरुषांनी संघर्ष केला. १९४७ मधील भारताची फाळणी हा इतिहासातील अत्यंत वेदनादायी अध्याय आहे. फाळणीच्या काळात लाखो निरपराधांना जीव गमवावा लागला, तर कोट्यवधी नागरिकांना आपली घरे, जमीन आणि मुळापासून विस्थापित व्हावे लागले. या त्रासदीत प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून विस्थापित कुटुंबांच्या संघर्षाला व धैर्याला नमन करण्यात आले.

भारत पुन्हा कधीही तुटू नये, विखुरला जाऊ नये तसेच देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राहावे, या उद्देशाने अखंड भारताचा संकल्प करण्यात आला आहे. डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात अशा रॅलींचे आयोजन करण्यात येत असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. रॅलीत राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत महामंत्री यजेंद्रसिंह ठाकूर, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नागपूर महानगर अध्यक्ष मोरेश्वर काकडे, आरबीडी महामंत्री निशिकांत पारधी, माई फाउंडेशनच्या सचिव अड. रूबी चौधरी, प्रकाश बघेले, निलेश बोपचे, श्रीकृष्ण तळेगावकर, जैलाल पटले, श्रीपद दखने, विनायक लांजेवार, राजकुमार पारधी, शिव पारधी, किशोर नागदेव, राहुल क्षीरसागर, रिया, आस्था, रुपेश, मल्हार, हिंगे आदी सहभागी झाले होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी माई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मोतीलाल चौधरी, वैबगंगा ग्रुपचे श्रीहरी चौधरी, अलायन्स ग्रुपचे मोतीलाल पटले, निसर्ग ग्रुपचे निशिकांत पारधी, मातोश्री ग्रुपचे राजू पटले, परिसरातील नागरिक, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची टीम, माई ग्रुपची टीम तसेच संपूर्ण स्टाफने विशेष सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.