spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘वनार्टी’चे धनगर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

– यूपीएससी, एमपीएससीसह लष्कर भरती परीक्षांच्या अर्ज प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागा अंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) द्वारे धनगर प्रवर्गातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षणाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय व लष्करी सेवेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या धनगर प्रवर्गातील विद्यार्थी या उपक्रमाद्वारे योग्य दिशा आणि दर्जेदार मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक मा. प्रशांत वावगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

या सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्यसेवा व इतर स्पर्धा परीक्षा, तसेच भारतीय लष्करातील विविध पदांसाठी होणाऱ्या सैनिक भरती परीक्षांच्या पूर्वतयारीचे सखोल धडे दिले जाणार आहेत. स्पर्धा परीक्षांमधील वाढती स्पर्धा लक्षात घेता, धनगर प्रवर्गातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना शासकीय सेवेच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या प्रशिक्षण योजनेचा प्रमुख उद्देश आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया १० ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २३ ऑगस्ट २०२६ ठेवण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी लागणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज भरण्याची संपूर्ण पद्धत ‘वनार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. धनगर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा पुरेपूर लाभ घेऊन स्पर्धा परीक्षेच्या तयारीला नवी गती द्यावी आणि आपले शासकीय सेवेतील करिअरचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन मा. प्रशांत वावगे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी ‘वनार्टी’च्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा: मंत्री अतुल सावे

धनगर प्रवर्गातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांनी ‘वनार्टी’च्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ घेत शासकीय सेवेत प्रवेशाचे ध्येय साध्य करावे, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष मा. अतुल सावे यांनी केले. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय व लष्करी सेवेत जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वनार्टी’च्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मा. अतुल सावे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.