spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कासारवडवलीतील ७८० मीटर लांबीचा डी.पी. रस्ता सामंजस्याने पूर्ण करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई :- ठाणे येथील कासारवडवली-मोगरपाडा गाव परिसरातील २० मीटर रुंद आणि ७८० मीटर लांबीच्या डी.पी. रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी सामंजस्याने चर्चा करून पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या संदर्भात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या रस्त्याच्या ७८० मीटर लांबीपैकी सुमारे १८० मीटर जागा ताब्यात आली असून उर्वरित ६०० मीटर जागेसाठी नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. उर्वरित जागा ताब्यात घेण्यास स्थानिक पातळीवर अडचणी येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

या रस्त्याचा उपयोग स्थानिक नागरिकांसाठीच होणार असल्याने स्थानिकांशी संवाद साधून सामंजस्याने प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि सर्वांच्या सहकार्याने रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एमएमआरडीएकडून या रस्त्याच्या कामासाठी मेसर्स गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला ७ फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कामात अडथळे येत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊन काम सुरळीतपणे पूर्ण करण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच कासारवडवली येथील रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला ठाणे महानगरपालिकेने आवश्यक सूचना द्याव्यात, असेही निर्देश देण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.