– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उडवली खिल्ली
मुंबई :- जनाब संजय राऊत, 2028 मध्ये खासदारकीची मुदत संपेल तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राच्या विधान परिषदेतही संधी मिळणार नाहीय. खासदारकी मिळणार, ना आमदारकी. हवेतर पुढची येणारी महापालिका निवडणूक लढण्याची संधी मिळते का, याचा विचार करा. आणि चुकून संधी मिळाली तरी नगरसेवकपदाची निवडणूकही जिंकू शकत नाहीत. तुम्हाला भांडुपमध्ये आपल्या वॉर्डमधून नगरसेवक निवडून आणता येत नाही आणि चालले देवाभाऊंना सल्ले द्यायला, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांची बुधवारी खिल्ली उडवली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात राहणार आणि 2029 ची निवडणूकही आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढणार आणि जिंकणार. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का महाराष्ट्रात राहणार, याची चिंता करण्यापेक्षा आपला उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करायचा की समाजवादी पार्टीत याची चिंता संजय राऊत यांनी करावी. कारण आता ज्या पद्धतीने ते वैचारिक भूमिका घेत आहेत, त्या वैचारिक भूमिका समाजवादी पार्टीला आणि काँग्रेसला सुसंगत आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला घरी बसण्याची आवडती जबाबदारी दिली आहे, असा टोला बन यांनी लगावला.
संजय राऊतांना वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार झेपत नाहीत. राऊत हे आता काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे वैचारिक वारसदार झालेत. राहुल नार्वेकर यांनी योग्य निर्णय दिला आणि तो योग्य होता यावर महाराष्ट्रातल्या जनतेला शिक्कामोर्तब केले आहे. लोकशाहीत जनता जनार्दन सर्वोपरी असते. जनतेचा निर्णय हा सगळ्यात मोठा निर्णय असतो आणि जनतेने निर्णय देऊन टाकला आहे, धनुष्यबाण आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. सर्वाधिक आमदार, खासदार एकनाथ शिंदे यांचे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या हातात उरते काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे झेंडे, अशा शब्दात बन यांनी राऊत यांची टर उडवली.
संजय राऊत यांनी रामशास्त्रीच्या गप्पा करू नयेत. सर्वात मोठे कामशास्त्री असलेल्या संजय राऊत यांनी न्यायालय, संविधानाबद्दल बोलू नये. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून त्यांना खूप आनंद झाला. आनंदाचे भरते आले होते, की निकाल आमच्या बाजूने लागेल. परंतु जेव्हा एकनाथजी शिंदे यांचे वकील आपले म्हणणे मांडतील तेव्हा तुमची पळता भुई थोडी होईल. तुम्ही निवडणूक आयोगावर, सर्वोच्च न्यायालयावर शंका घेतली आहे. रामशास्त्री कोण आहेत, हे शोधण्यापेक्षा आपण स्वतः कामशास्त्री झालो आहोत, याचे आत्मचिंतन करून मग न्यायालयावर टीका-टिप्पणी करावी, असे बन यांनी सुनावले.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडियासाठी महापालिकेने कुठेही 25 लाख रुपयांची निविदा काढलेली नाही. ती निविदा फक्त मुंबईच्या महापौरांसाठी नाही तर संपूर्ण मुंबई महापालिकेसाठी आहे. मुंबई महापालिकेचे आणि वेगवेगळ्या विभागांची सोशल मीडिया अकाउंट चालवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ही निविदा काढली जाते. याआधी मुंबईत प्रशासनाची राजवट होती, तेव्हाही मुंबई महापालिकेचे सोशल मीडिया अकाउंट चालवण्यासाठी ही निविदा काढली होती. मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी करायची, ही मानसिकता ना मुंबईच्या महापौरांची आहे, ना मुंबईच्या नगरसेवकांची आहे, असे बन यांनी स्पष्ट केले.





