spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महावितरणच्या ‘ग्राहक समाधान शिबिरा’त नागपुरात 91 टक्के तक्रारींचा जागेवरच निपटारा; वीज ग्राहकांना मोठा दिलासा

नागपूर :- नागपूर शहरात वीज ग्राहकांच्या समस्यांचे तात्काळ, पारदर्शक आणि प्रभावी निवारण करण्यासाठी महावितरणतर्फे आयोजित ‘ग्राहक समाधान शिबिराला’ नागपूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. बुधवारी (दि. 19 ऑगस्ट 2026) पार पडलेल्या या विशेष शिबिरामध्ये वीज ग्राहकांच्या विविध अडचणींचे जागेवरच समाधान करण्यात आले असून, प्राप्त झालेल्या एकूण 336 तक्रारींपैकी तब्बल 306 तक्रारींचे (म्हणजेच 91.07 टक्के तक्रारींचे) ऑन दि स्पॉट यशस्वी निवारण करून ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. उर्वरित 30 तक्रारी देखील पुढील सात दिवसांच्या आत प्राधान्याने सोडवण्यात येतील, असा विश्वास महावितरणतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि अधीक्षक अभियंता प्रफुल लांडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर मंडलांतर्गत येणाऱ्या कॉग्रेसनगर, महाल, गांधीबाग, सिव्हील लाईन्स आणि बुटीबोरी या सर्व पाचही विभागांतील एकूण 19 उपविभागांमध्ये एकाच दिवशी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वीज ग्राहकांच्या समस्या त्यांच्याच कार्यक्षेत्रात जलदगतीने सुटाव्यात, हा यामागचा मुख्य उद्देश होता. शिबिरामध्ये प्रामुख्याने नवीन वीज जोडणी, वीज बिलांमधील नावात व पत्त्यात बदल, सरासरी व वाढीव वीजबिले, रुफ टॉप सौर योजना तसेच आधुनिक स्मार्ट मीटरशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. या सर्व समस्यांचे तात्काळ उच्चाटन करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते आणि सर्व संबंधित तांत्रिक कर्मचारी प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते.

विशेष म्हणजे, आलेल्या तक्रारींवर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली. यात नाव व पत्त्या बदलासंबंधीच्या सर्व 30 तक्रारी, खंडित वीज पुरवठ्याच्या 18 पैकी 18 तक्रारी आणि नवीन वीज जोडणीच्या 2 तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला. तसेच, वाढीव बिलांच्या 158 पैकी 152 तक्रारी, स्मार्ट मीटरच्या 53 पैकी 47 तक्रारी आणि रुफ टॉप सौर योजनेच्या 44 पैकी 39 तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत स्मार्ट मीटरबाबतच्या शंकांचे सविस्तर निरसन केले. अचूक मीटर रीडिंग, दिवसा वीज वापरावर मिळणारी प्रति युनिट 85 पैसे सवलत, ग्राहकाच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध होणारी रिअल टाईम वीज वापराची नोंद आणि करंट लिकेजची अचूक माहिती यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे स्मार्ट मीटर अत्यंत पारदर्शक व फायदेशीर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांच्या प्रत्येक अडचणीला प्राधान्य देऊन ती सोडवली जाईल, अशी ग्वाही महावितरणने उपस्थित ग्राहकांना दिली. हे ग्राहक समाधान शिबिर आता दर महिन्याच्या पहिल्या आणि तिस-या बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत सर्व उपविभागिय कार्यालयांत आयोजीत करण्यात येनार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.